केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घेतली शिर्के यांची भेट
By admin | Published: February 16, 2017 10:43 PM2017-02-16T22:43:26+5:302017-02-16T22:43:40+5:30
सुभाष भामरे : पोलिसांबाबत मुख्यामंत्र्यांकडे तक्रार करणार
मालेगाव : गोवंश रक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेला हल्ला निंदणीय आहे. पोलिसांनी या अगोदर गोवंश हत्त्याबंदी कायद्यांतर्गत कारवाई केली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पोलिसांना जाब विचारण्यास सांगणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.
शिर्के यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शिर्के यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे आज मालेगावी आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. भामरे पुढे म्हणाले की, शहरासह इतर ठिकाणी गोवंश हत्त्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात पोलीस यंत्रणा दिरंगाई करीत आहे. याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. शिर्के यांच्यावर झालेला हल्ला निंदणीय आहे. या घटनेसंदर्भात पोलीस यंत्रणेला तपासाच्या योग्य त्या सूचना करणार असल्याचेही डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी शिर्के यांची रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर येथील संघ कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महानगरप्रमुख सुनील गायकवाड, सुरेश निकम, मदन गायकवाड, हरिप्रसाद गुप्ता, उमाकांत कदम, संजय काळे, राजेंद्र शेलार, प्रदीप बच्छाव आदिंसह भाजपा, विहिंप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मालेगावी हल्ल्यात जखमी झालेले गोवंश रक्षक मच्छिंद्र शिर्के यांची तपासणी करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
डॉ. सुभाष भामरे. समवेत भाजपाचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड, प्रदीप बच्छाव आदि.