काशी ते दक्षिण काशीची अनोखी यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:18+5:302021-01-25T04:16:18+5:30

नाशिक : प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ ...

Unique journey from Kashi to South Kashi | काशी ते दक्षिण काशीची अनोखी यात्रा

काशी ते दक्षिण काशीची अनोखी यात्रा

Next

नाशिक : प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. मात्र, त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, काशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांचे बालपणाचे सारे शिक्षण काशीत झाले असून मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा साहित्यातील सर्वेाच्च सन्मान दक्षिण काशी म्हणून सर्वज्ञात असलेल्या नाशिकमध्ये मिळणार आहे. त्यामुळे डॉ. नारळीकर यांच्या निमित्ताने ही दोन तीर्थक्षेत्रे वैज्ञानिक दृष्टीने जोडली जाणार आहेत.

डॉ. नारळीकर यांच्या मातोश्री सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. त्यामुळे माता-पिता दोघांकडूनच त्यांना शिक्षणाचे बाळकडू मिळालेले होते. वयाच्या २१ व्या वर्षी १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी मिळवतानादेखील प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी पीएचडी, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. १९७२ साली भारतात परतल्यावर त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात विभागप्रमुख म्हणून कार्य केले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.

इन्फो

साहित्यिक कामगिरी

संशोधनाबरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत. त्यांनी लिहलेल्या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने अंतराळातील भस्मासुर , अंतराळातील स्फोट, अभयारण्य , चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, आत्मचरित्र चार नगरांतले माझे विश्व, पाहिलेले देश भेटलेली माणसं, समग्र जयंत नारळीकर तसेच पत्नी मंगला आणि डॉ. अजीत केंभावी यांच्यासमवेत लिहलेले नभात हसरे तारे अशा पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्यावर डॉ. विजया वाड यांनी 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे. जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.

इन्फो

संशोधनातील कार्याची महती

चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. त्यांचे संशोधन हे स्थिर स्थिती सिद्धान्त म्हणून प्रख्यात आहे. त्यांच्या संशोधन क्षेत्रातील अव्दितीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

इन्फो

सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित

१९६५ या वर्षी पद्मभूषण तर २००४ या वर्षी पद्मविभूषण या सर्वेाच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेला हा एक तासाचा लघुपट आहे.

Web Title: Unique journey from Kashi to South Kashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.