अनोखे आंदोलन : शासनाच्या धोरणांचा निषेध ‘स्वाभिमानी’कडून मोफत दूधवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:17 AM2018-05-04T00:17:04+5:302018-05-04T00:17:04+5:30
सिन्नर : गेल्यावर्षी शेतकरी संपाच्या वेळी किसान क्रांती मोर्चाला दूध दराबाबत दिलेले आश्वासन शासनाकडून पाळले जात नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सिन्नर येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती व पोलीस ठाण्यात अनोखे आंदोलन करीत मोफत दूध वितरण करण्यात केले.
सिन्नर : गेल्यावर्षी शेतकरी संपाच्या वेळी किसान क्रांती मोर्चाला दूध दराबाबत दिलेले आश्वासन शासनाकडून पाळले जात नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सिन्नर येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती व पोलीस ठाण्यात अनोखे आंदोलन करीत मोफत दूध वितरण करण्यात केले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना मोफत दूधवाटप केले. त्यानंतर दूध दराबाबत तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले. गेल्या वर्षी शेतकरी संपाच्या वेळी किसान क्रांती मोर्चाला दूध दराबाबत व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्ष होत आले असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. १० जून २०१७ रोजी पशु व दुग्ध मंत्रालयाने परिपत्रक काढून दुधाला २७ रुपये प्रतिलिटर दर देणे संघांना बंधनकारक केले होते. शेतकऱ्यांना प्रतिलिटर दूध उत्पादन करण्यासाठी २२ रुपये ४० पैसे खर्च येत असताना प्रत्यक्षात शेतकºयांना मात्र १९ रुपयांच्या आत सर्रास दर दिला जात आहे. ही परिस्थिती गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असून, शेतकºयांना मागील वर्षाच्या तुलनेत प्रतिलिटर १० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. सुमारे दोन कॅन म्हणजे १०० लिटर दूध तहसील कार्यालय, पंचायत समिती व पोलीस ठाण्यात नेऊन अधिकारी, कर्मचारी व आलेल्या नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. तहसीलदार नितीन गवळी, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाणी, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनाही ग्लासमध्ये दूध देण्यात आले. या दूधवाटपाच्या अनोख्या आंदोलनात शांताराम पगार, संजय वारुळे, कृष्णा घुमरे, बाबासाहेब पगार, संपत पगार, धनंजय निरगुडे, दिनेश पगार, बारकू पगार, अॅड. विलास पगार सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूधवाटप या अनोख्या आंदोलनात भाजपाचे कार्यकर्ते अग्रभागी असल्याचे दिसून आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष व पांगरी गणाचे भाजपाचे पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, बाजार समितीचे माजी उपसभापती व भाजपाचे तालुका पदाधिकारी सोमनाथ भिसे या दूध वाटपाच्या उपक्रमात सहभागी झाले होते.