बाळ ठाकरेंच्या दातृत्वाची अनोखी कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:27 PM2018-10-30T16:27:50+5:302018-10-30T16:38:27+5:30
शुभवर्तमान : पोलीस पाटलाने घडविले माणुसकीचे दर्शन
नितीन बोरसे,सटाणा : गावात काही अनुचित घडले की, पोलिसांना तातडीने खबर पोहोचविणारा पोलीस पाटील तसा उपेक्षित घटक. त्याची कमाईही फारशी नाही. पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या या पोलीस पाटीलमधील संवेदनशील माणसाचे दर्शन घडविले आहे ते बागलाण तालुक्यातील कुपखेडाचे बाळ ठाकरे यांनी. ठाकरे आणि जायखेडयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आखतवाडे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख ११ हजार रु पयांची मदत करून दातृत्वाचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.
बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील किशोर बापू खैरनार (वय २६) या तरु ण शेतक-याने सततच्या नापिकीमुळे मृत्यूला कवटाळून आपले जीवन संपविले. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळला. नेहमीप्रमाणे शाब्दीक मदतीचा मारा केला. प्रत्यक्षात कुटुंबीयाच्या हातात काहीच पडले नाही. दोन बिगा जमिनीवर गुजराण करणा-या या कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती पाहून कुपखेडा येथील पोलीस पाटील व द्राक्ष बागायतदार बाळ ठाकरे यांना गहिवरून आले. त्यांनी या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा मनोमन निश्चय केला. मात्र गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष -डाळींब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा फटका ठाकरे यांनाही बसला होता. त्यामुळे ठाकरे यांना दिलेला शब्द पाळता आला नव्हता. ही बोच त्यांना होतीच. सुदैवाने यंदा द्राक्षाला चांगला भाव मिळाला आणि पहिल्याच तोडीला मिळालेल्या पैशातून एक लाख रु पयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. ठाकरे यांनी ही बाब जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना सांगितली. ठाकरे यांनी दाखविलेल्या दातृत्वाला सलाम करत गुरव यांनी देखील आपलाही खारीचा वाटा म्हणून त्यात अकरा हजार रु पयांची भर टाकली. पोलीस अधिकारी आणि पोलीस पाटील यांनी एक लाख अकरा हजार रु पयांची मदत कोणताही गाजावाजा न करता खैरनारा परिवाराला सुपूर्द केली.
दातृत्वाचा निर्झर
बाळ ठाकरे यांनी यापूर्वी पाच विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्यावर गेल्या सात वर्षांपासून शैक्षणिक खर्च करत आहेत. तसेच दरमहा मिळणारे पोलीस पाटीलचे मानधन त्यांच्याकडून नामपूर येथील दोन अपंग व एका जेष्ठ नागरिकाला दिले जाते. पोलीस निरीक्षक गुरव देखील गरीब विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य दरवर्षी पुरवतात. प्रसंगी वैद्यकीय उपचारासाठी धावून येतात.