समाजातील सज्जनशक्तीचा अनोखा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 12:29 AM2021-11-21T00:29:36+5:302021-11-21T00:33:28+5:30

दीड वर्षांचा कोरोना काळ हा प्रत्येकाची कसोटी पाहणारा होता. त्याच्या कटुस्मृती पुसता न येणाऱ्या आहेत. तरीही त्यावर मात करीत दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. माणुसकीचा प्रत्यय देणारे उपक्रम राबविले गेले. आदिवासी पाडे, झोपडपट्टीतील वंचित बांधवांपर्यंत फराळ, कपडे अशा माध्यमातून शहरी लोक पोहोचले. मूळ गावी जाऊन दिवाळी साजरी करत असताना श्रमदानातून बंधारे, कच्चे रस्ते बांधण्याचे उपक्रम काही गावांमध्ये हाती घेण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळावा घेत असताना शाळेसाठी अर्थसाहाय्य केले. वस्तूरुपाने मदत केली.

A unique suffix of gentlemanliness in society | समाजातील सज्जनशक्तीचा अनोखा प्रत्यय

समाजातील सज्जनशक्तीचा अनोखा प्रत्यय

Next
ठळक मुद्देकोरोना काळातील दु:ख विसरून समाजातील वंचितांच्या मदतीसाठी पुढाकार

मिलिंद कुलकर्णी

दीड वर्षांचा कोरोना काळ हा प्रत्येकाची कसोटी पाहणारा होता. त्याच्या कटुस्मृती पुसता न येणाऱ्या आहेत. तरीही त्यावर मात करीत दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. माणुसकीचा प्रत्यय देणारे उपक्रम राबविले गेले. आदिवासी पाडे, झोपडपट्टीतील वंचित बांधवांपर्यंत फराळ, कपडे अशा माध्यमातून शहरी लोक पोहोचले. मूळ गावी जाऊन दिवाळी साजरी करत असताना श्रमदानातून बंधारे, कच्चे रस्ते बांधण्याचे उपक्रम काही गावांमध्ये हाती घेण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळावा घेत असताना शाळेसाठी अर्थसाहाय्य केले. वस्तूरुपाने मदत केली. सज्जनशक्तीचा हा अनोखा प्रत्यय दिलासादायक आहे.
न भूतो न भविष्यती असा कोरोना काळ सगळ्यांनी अनुभवला. त्यातून बाहेर पडायला काही काळ जाऊ द्यावा लागेल. भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवाने लोकांमध्ये ऊर्जा निर्माण होते, त्याचा प्रत्यय दिवाळी सणामध्ये आला. दु:ख विसरून प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार सण साजरा केला. घरामधील जिवलग व्यक्ती या काळात हिरावली गेली, त्या दु:खाची छाया या उत्सवावर असली तरी इतरांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न झाला. ह्यइंडियाह्ण आणि ह्यभारतह्ण अशा चर्चा अधूनमधून झडतात आणि समाजातील दरी, विसंगतीवर बोट ठेवले जाते. पण या वादात न पडता वंचितांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून प्रयत्न झाले. आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन दिवाळी फराळ तसेच नवीन कपडे देण्यात आले. केवळ ह्यवाटपह्ण करणे अशी औपचारिकता नव्हती, तर त्यांच्यासोबत एक दिवस घालविण्यात आला. झोपडपट्टीतील वंचितांनाही अशी मदत करण्यात आली. त्यासाठी संस्था, संघटनांनी पूर्वतयारी, पूर्वनियोजन केले. प्रत्येकाला खारीचा वाटा उचलता यावा, यासाठी आवाहन केले. पाड्यात जाण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना सोबत घेण्यात आले. पारदर्शकता जपण्यात आली. कोठेही याची प्रसिध्दी नाही. चर्चा नाही. फलकबाजी नाही, भाषणबाजी नाही. ही सज्जनशक्ती समाजाचे बळ आहे. ती जपायला हवी.
श्रमसंस्काराची जपणूक
कोरोना काळात माणसे घरात कोंडली गेली होती. दोन लाटा येऊन गेल्या, तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही सर्व बंधने पाळून लोकांची मूळ गावाकडे पावले वळाली. नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळींच्या भेटी, सहवास हा ऊर्जा, उत्साह देणारा असतो. त्यामुळे दीड वर्ष भेटीगाठी झाल्या नसल्याने ओढ अधिक वाढली; पण गावात जाऊनही केवळ गप्पाटप्पा, आराम, पर्यटन, असे न करता लोकांनी गावाच्या गरजा ओळखून श्रमदान केले. कच्चे बंधारे बांधले, शेतवाटा तयार केल्या. गावातील, गल्लीतील लोकांनी एकत्र येऊन केलेले हे श्रमदान सकारात्मक पायंडा तयार करणारे ठरले. परगावी राहणाऱ्या लोकांना गावाची असलेली ओढ, आपल्या गावात सोयी-सुविधा व्हाव्यात यासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे त्यांनी उचललेले पाऊल खूप महत्त्वाचे आहे. असाच उत्साह माजी विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करीत गट तयार केले. स्नेहमेळावा गावात, शाळेत घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला. त्यासोबतच शाळेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी, पायाभूत सुविधांसाठी अर्थसाहाय्य, वस्तुरूपाने मदत केली. आणखी काय करता येईल, यासंबंधी विचारमंथन केले. आपल्या गावाविषयी, शाळेविषयी असलेली आस्था, जिव्हाळा यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. या सकारात्मक गोष्टी पाहता ग्रामस्थांचीही जबाबदारी वाढली आहे. गावकीच्या राजकारणात गावाचा विकास कुठे रुतला आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मूळ रहिवासी असलेल्या; परंतु वेगवेगळ्या शहरांत, देशात राहणाऱ्या नागरिकांच्या ज्ञानाचा, मदतीचा लाभ गावासाठी व्हावा, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. आठवड्यासाठी, एक दिवसासाठी गावात येणाऱ्या मूळ रहिवाशांनी केलेले श्रमदान, दातृत्व पाहता त्यांची या मातीशी जुळलेली नाळ, या मातीविषयी त्यांना असलेली ओढ दिसून आली. आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांना योगदान देण्याची इच्छा आहे. फक्त राजकारण, श्रेयवाद यात पडण्याची त्यांची इच्छा नसते. पारदर्शकतेने कामे झाल्यास मदतीसाठी अनेक हात पुढे येऊ शकतात. कोरोनापश्चात या काळात हा विश्वास गावकऱ्यांना मिळाला, हे महत्त्वाचे आहे.

 

Web Title: A unique suffix of gentlemanliness in society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.