नाशिकला किमान कौशल्य विद्यापीठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:08 AM2018-04-05T00:08:59+5:302018-04-05T00:08:59+5:30
राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील साडेतीनशे महाविद्यालयांतील एक लाख ६० हजार जागांपैकी बहुतांशी जागा रिक्त आहेत. येणाऱ्या काळात व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यापीठच बनविण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन उद्योजकता व कौशल्य विकास आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव असिम गुप्ता यांनी केले.
सिडको : राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील साडेतीनशे महाविद्यालयांतील एक लाख ६० हजार जागांपैकी बहुतांशी जागा रिक्त आहेत. येणाऱ्या काळात व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यापीठच बनविण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन उद्योजकता व कौशल्य विकास आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव असिम गुप्ता यांनी केले. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् व नाशिक डिस्ट्रिक इनोव्हेटिव्ह कौन्सिल (एनडीआयसी) यांच्या पुढाकाराने नाशिक ‘इनोव्हेशन डे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, एनईसीचे उपाध्यक्ष के. एस. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी गुप्ता यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या स्टार्टअप पॉलिसीविषयी माहिती देऊन विविध क्षेत्रातील नवीन उद्योजकांना या पॉलिसीचा विविध उद्योगांसाठी कसा फायदा घेता येईल हे स्पष्ट केले. तसेच इनोव्हेशन आणि स्टार्टअप यातील फरक स्पष्ट करताना त्यांनी तयार केलेली स्टार्टअपसाठी असलेले धोरण त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. तसेच इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारचा उपक्र म राबविण्याची गरज असल्याचे संगितले. एनईसीसारख्या इतर क्लस्टरची स्थापना करून त्यांचा उपयोग इंडस्ट्रियल हब म्हणून औद्योगिक क्षेत्राला नक्कीच होईल, असेही शेवटी असिम गुप्ता यांनी सांगितले. खासदार हेमंत गोडसे यांनी नवीन उद्योजकांसाठी विविध योजना राबविण्याचा मनोदय व्यक्त केला आणि शहरातील प्रतिभावंत उद्योजक शहरातच कसे थांबतील याविषयीच्या उपाययोजना खासदार गोडसे यांनी अधोरेखित केल्या. जिल्हाधिकरी राधाकृष्णन बी. यांनी इतर मोठ्या शहरांशी स्पर्धा करण्यासाठी नाशिकला लाभलेल्या उत्पादन क्षेत्रात नावीन्यता आणणे उपयोगी ठरू शकते, असे सांगितले. कार्यक्र मात औद्योगिक पातळीवरील दहा प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले होते. के. एस. पाटील यांनी स्वागत केले.
राज्याचे इनोव्हेशन धोरण ठरणार
विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यासाठी इनोव्हेशन धोरण तयार करण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती यावेळी प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी दिली. स्टार्टअप आणि इनोव्हेशन हे दोन पूर्णत: स्वतंत्र असून त्यामुळे इनोव्हेशनसाठी स्वतंत्र धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात नावीन्यपूर्ण संकल्पनांसाठी इनोव्हेशन क्लब स्थापन करावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन् यांनी सांगितले. अशा उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.