मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचितच
By admin | Published: December 6, 2014 12:34 AM2014-12-06T00:34:01+5:302014-12-06T00:44:50+5:30
समाजकल्याणकडे प्रस्तावच नाही
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने इतर विद्यापीठांप्रमाणे शिष्यवृत्ती योजना मंजूर केली आहे; परंतु विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार व समन्वयाचा अभाव यामुळे या योजनेचा लाभ लाभार्थी विद्यार्थी घेऊ शकणार नसल्याने ते वंचित राहणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ समाजकल्याण विभागाकडे आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर असून, अद्याप विद्यापीठाच्या बहुतांश केंद्रांनी या विभागाकडे प्रस्ताव पाठवून युजर आयडी व पासवर्डच घेतले नसल्याचे वास्तव समोर आले आहे़ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची संपूर्ण राज्यात चार हजार २४२ केंद्रे आहेत़ काम करून, रोजीरोटी सांभाळून यामध्ये शिक्षण घेता येत असल्याने मागासवर्गीय, गरीब असे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटनांच्या मागणीनंतर मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही इतर विद्यापीठांप्रमाणे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यास केंद्र शासनाने २०१० मध्ये मंजुरी दिली आहे़ तसा पत्रव्यवहार विद्यापीठाशी करण्यात आला आहे़ इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी असणारे नियम व मुक्त विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांच्या निकषांमध्ये बदल आवश्यक असल्याने ही योजना तीन वर्षे लांबली गेली होती़ यामुळे अद्याप विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नव्हता़ सर्व पूर्तता होऊन शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी तरी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते; परंतु अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार व समन्वयाच्या अभावामुळे समाजकल्याण विभागाला प्रत्येक केंद्रासाठी युजर आयडी व पासवर्डसाठीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेच नाहीत़