सायबर सुरक्षेविषयी पुणे विद्यापीठ बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:45 AM2018-05-13T00:45:04+5:302018-05-13T00:45:04+5:30

देशातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. या घटनेनंतर विद्यापीठाच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता, मात्र यातून धडा न घेता ‘चोरी तर होणारच...’ या दृष्टिकोनातून विद्यापीठ हे सर्व प्रकरण हाताळत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

 University of Pune about cyber security | सायबर सुरक्षेविषयी पुणे विद्यापीठ बेफिकीर

सायबर सुरक्षेविषयी पुणे विद्यापीठ बेफिकीर

googlenewsNext

नाशिक : देशातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. या घटनेनंतर विद्यापीठाच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता, मात्र यातून धडा न घेता ‘चोरी तर होणारच...’ या दृष्टिकोनातून विद्यापीठ हे सर्व प्रकरण हाताळत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.  देशात एनआरएफ रँकिंगमध्ये नवव्या क्र मांकावर असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्व परीक्षा आॅनलाइन पद्धतीने करण्यावर भर देत आहे. सध्या बीए, बी.कॉम, एम. कॉम, बीएससी, एमएससी, विधी, अभियांत्रिकी, एमबीए आदी शाखांच्या परीक्षा सुरू असून, सर्व प्रश्नपत्रिका संकेतस्थळाद्वारेच आॅनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांना पाठविल्या जात आहेत. याचाच फायदा घेऊन अभियांत्रिकीच्या दोघा विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील ई-मेल हॅक करून बीएससीच्या द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फोडला होता. या दोघा उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आॅनलाइन परीक्षा पद्धतीलाच खिंडार पाडल्याने सायबर सुरक्षेचा गंभीर मुद्दा समोर आला.  त्याचबरोबर विद्यापीठाकडून नियमित सायबर सिक्युरिटी आॅडिट केले जात काय? विद्यापीठ व महाविद्यालय यांच्याशी निगडित असलेले संकेतस्थळ आणि ई-मेल यांना एनआयसी प्रमाणपत्र आहे काय? जर शिकाऊ विद्यार्थी संकेतस्थळ हॅक करू शकतात, तर मग मुत्सद्दी हॅकर्स असे करू शकणार नाहीत याची काय शाश्वती?  असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याविषयी जेव्हा विद्यापीठाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी, ‘आम्ही याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळून असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ‘तुमच्याकडे एखादी वस्तू असेल तर ती चोरीला जाणारच’ असेही म्हटले. विद्यापीठाच्या या बेफिकीर भूमिकेमुळे विद्यापीठ त्यांच्या सायबर सुरक्षेबद्दल किती गंभीर आहे, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या विद्यापीठ आॅनलाइन परीक्षा पद्धतीवर अधिक भर देताना दिसत आहे. अशात सायबर सुरक्षेबद्दलही पुरेशा उपाययोजना करणे गरजेचे असूून, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही यादृष्टीने विद्यापीठाने आयटी विभाग आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचा सूर विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.
आॅडिट नावालाच...
पुणे विद्यापीठाच्या आयटी विभागाकडून सायबर सुरक्षा आॅडिट नियमितपणे केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र ते नावालाच असल्याचे समोर आले आहे. कारण या प्रकरणात जे वेब मेल पेज हॅक करण्यात आले, त्याचे सॉफ्टवेअर विद्यापीठाने २०११ पासून अपडेटच केले नव्हते. ‘राउंड क्यूब’ नावाचे हे सॉफ्टवेअर असून, त्याचा पासवर्डही खूपच सोपा होता. (उदा. १२३४५) हे सॉफ्टवेअर अपडेट केले नसल्याने हॅकर्सला ते स्कॅन करणे सहज शक्य झाले. विद्यापीठाने आॅडिटमध्ये या सॉफ्टवेअरवर काम केले असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता.

 

Web Title:  University of Pune about cyber security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.