दि्व्यांगांच्या शैक्षणिक कामात विद्यापीठाद्वारे योगदान देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:54+5:302021-02-07T04:14:54+5:30
नाशिक : दिव्यांग, दृष्टीबाधित प्रवर्गातील शिक्षक, प्राध्यापकांना पुरस्कार प्रदान करताना मलाच मानवी मूल्यांची नवी दृष्टी लाभली आहे. त्यामुळे ...
नाशिक : दिव्यांग, दृष्टीबाधित प्रवर्गातील शिक्षक, प्राध्यापकांना पुरस्कार प्रदान करताना मलाच मानवी मूल्यांची नवी दृष्टी लाभली आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या शैक्षणिक कार्यात विद्यापीठाद्वारे योगदान देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन, असे प्रतिपादन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशीकला वंजारी यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, कल्याणी एज्युकेशनचे चेअरमन रवींद्र सपकाळ, मानद महासचिव गोपी मयूर, पुरस्कार समितीचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सूर्यभान साळुंखे उपस्थित होते. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या वतीने आयोजित सोहळ्यासाठी सपकाळ नॉलेज हबतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केजी ते पीजीपर्यंतचे दृष्टीबाधितांचे शिक्षण संस्थेच्या वतीने देण्याचे जाहीर करतानाच या उपक्रमासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या ४२ विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्कार तर प्रथम श्रेणीतील १९ पदवीधर विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. दृष्टीबाधितांच्या शैक्षणिक क्षेत्रातील या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यास सलग २३ व्या वर्षी २३ वे कुलगुरु उपस्थित राहिले. हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य यंदाच्या वर्षीदेखील कायम राहिले. या पुरस्कार निवड समितीत डाॅ. अश्विनीकुमार भारद्वाज, डॉ. भास्कर गिरधारी, डॉ. प्रा. सुनील कुटे, डॉ. प्रा. सिंधू काकडे, प्रा. विजयकुमार पाईकराव तर समिती सचिव म्हणून संपत जोंधळे यांनी कामकाज पाहिले. प्रास्ताविक रामेश्वर कलंत्री यांनी तर प्रा. सुहास धांडे आणि गोपी मयूर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. पुरस्काराची संकल्पना मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी मांडली. सूत्रसंचालन शाम पाडेकर यांनी तर अश्विनीकुमार भारद्वाज यांनी आभार मानले.
इन्फो
विशेष सन्मान
या सोहळ्यात आदर्श प्राध्यापक म्हणून औरंगाबादच्या प्रतीक पद्माकर देशपांडे यांना तर दृष्टीबाधित विशेष शिक्षक म्हणून कोल्हापूरच्या संगीता मारुती पुंड, रत्नागिरीच्या सौरवी संतोष जाधव यांना तर डोळस शिक्षक पुरस्कार नागपूरच्या विवेक हरीहर लोहकरे आणि कैलास बाबूराव निकम यांना प्रदान करण्यात आला. तर संस्थेसाठीचा पुरस्कार नगरच्या अनामप्रेम स्नेहालय परिवारास प्रदान करण्यात आला. तर गिर्यारोहणासाठी विशेष पुरस्कार प्रसाद भिवाजी गुरव तर क्रीडा क्षेत्रासाठी सागर वसंत बोडके याला गौरविण्यात आले. त्याशिवाय मालेगावच्या शिक्षिका सविता बाजीराव निकम आणि सारिका पांडुरंग गायकवाड यांना गौरविण्यात आले.
फोटो (हार्ड कॉपी)
नॅबतर्फे आयोजित आदर्श प्राध्यापक, शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी दीपप्रज्वलन करताना कुलगुरू शशीकला वंजारी. समवेत रामेश्वर कलंत्री, रवींद्र सपकाळ, गोपी मयूर,मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, पद्माकर देशपांडे आदी पदाधिकारी.