विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाला ठोकले टाळे
By admin | Published: July 21, 2016 11:08 PM2016-07-21T23:08:24+5:302016-07-21T23:14:51+5:30
अभियांत्रिकी निकाल : विद्यार्थी कृती समितीतर्फे आंदोलन
नाशिक : अभियांत्रिकी निकालाबाबत समितीच्या अहवालानंतरही विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असून, याप्रकरणी कृती समितीने नाशिक विभागीय कार्यालयास टाळे ठोकले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी पुन:श्च मागणी करण्यात आली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी परीक्षेच्या द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्ष परीक्षेचा निकालातील गोंधळानंतर नियुक्त समितीनेही भ्रमनिरास केला असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोणताही लाभ झाला नसल्याचा आरोप करीत विद्यार्थी कृती समितीने तीव्र आंदोलन केले.
विद्यार्थी संघटनांच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष निकाल यांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन खराटे आणि डॉ. योगेश नेरकर या तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने काय निर्णय घेतला आणि कोणते निकष लावले याची माहिती नाशिक विभागीय कार्यालयाकडे नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थी कृती समितीने तीव्र आंदोलन छेडले. कोणत्याही कारणासाठी ‘पुण्याला जायचेच असेल तर मग नाशिक विभागीय कार्यालयाची गरजच काय’ असा सवाल करत विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.
या आंदोलनादरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत विद्यापीठ समन्वयक रावसाहेब शिंदे यांनी परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले.
या संभाषणा दरम्यान तृतीय आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अधिनियमन ४ लागू करण्यात येणार असून, या अधिनियमाप्रमाणे लेखी परीक्षेत ७० पैकी २१ पेक्षा अधिक गुण आणि सहामाही परीक्षेत नऊपेक्षा अधिक गुण असलेले आणि फक्त एकाच विषयात अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अधिनियमन चारप्रमाणे दहा गुण देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे दिली. यावेळी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांच्यासह विशाल गांगुर्डे, आकाश भामरे, कौस्तुभ आंधळे, आदित्य गायकवाड, पराग भामरे, अभिजित बुराडे, स्वप्नील सोनवणे, रवि गोवर्धने आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)