सिन्नर परिसरात अज्ञात युवतीचा खून
By Admin | Published: March 8, 2016 10:46 PM2016-03-08T22:46:06+5:302016-03-08T22:47:54+5:30
हिवरगाव : निर्दय प्रकाराने परिसर हादरला
सिन्नर : शीर कापून तुकडे केलेल्या अवस्थेत २० ते २५ वयोगटातील अज्ञात युवतीचा मृतदेह तालुक्यातील हिवरगाव शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे हिवरगाव परिसर हादरला असून, अज्ञात युवतीचा व मारेकऱ्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
हिवरगाव-सायखेडा रस्त्यावरील हिवरगाव शिवारात नानू कारभारी कांडेकर यांच्या शेतालगतच्या रस्त्याच्याकडेच्या गटारीत धारधार शस्त्राने वार करून शरीराचे तीन-चार तुकडे केलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची खबर एमआयडीसी पोलिसांना सकाळी ११ वाजेच्या सुमारास मिळाली. पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अंगावर केवळ अंतरवस्त्र असलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाला शीर नव्हते. अज्ञात व्यक्तीने खून करून मृतदेह या शिवारात आणून टाकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह ओळखू येऊ नये यासाठी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मारेकऱ्याने केला असल्याचे मृतदेहाच्या अवस्थेवरून समजते. हातात केवळ बाजारु जरमलची एक बांगडी दिसून आली. धारधार शस्त्राने शरीराचे तुकडे केल्याचे दिसून आले.
पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर फॉरेन्सीक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणीसाठी काही नमुने घेतले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासकामी सूचना केल्या. परिसरातून या वयोगटातील कोणती युवती बेपत्ता आहे का, याची माहिती पोलीस घेत होते. याबाबत कोणाला माहिती असल्यास सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात (०२५५१-२४०४३३) संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी केले आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपकाळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)