आधी चर्चा केली, नंतर डॉक्टरांवर केले १५ वार; आज नाशिकमध्ये ओपीडी बंद, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 09:14 AM2024-02-24T09:14:53+5:302024-02-24T09:15:37+5:30
हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात; प्रकृती चिंताजनक
पंचवटी : दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) रात्री साडेनऊ वाजता घडली. संशयिताने केबिनची कडी लावून शर्टच्या मागे लपविलेला कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर तसेच मानेवर १५ वार केले. हल्लेखोर व राठी यांच्यात अगोदर दहा ते बारा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतरच्या शाब्दिक वादानंतर संशयिताने राठी यांच्यावर वार केले. या घटनेत डॉ. राठी गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉ. राठी शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये असताना ३० ते ३५ वयोग- टातील अज्ञात व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आला. डॉ. राठी यांचे संशयिताबरोबर बोलणे झाले. दोघेही दुसऱ्या केबिनमध्ये चर्चेसाठी गेले असता दोघांत शाब्दिक वादावादी झाली. डॉ. राठी यांच्या केबिनमध्ये आवाज आल्याने रुग्णालय कर्मचारी धावत गेले असता तोपर्यंत संशयिताने पळ काढला होता. संशयिताने जोरदार वार केल्याने डॉ. राठी केबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व तेथे पोहोचलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. रिना राठी यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने राठी यांना रात्री अपोलो रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास
संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. अज्ञाताने राठी यांच्यावर हल्ला का केला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून वैयक्तिक वादातूनच हल्ला केला असावा, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. हल्ल्यानंतर राठी यांच्या मित्रपरिवाराने गर्दी केली होती.
आज आयएमएचा मोर्चा
या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेने निषेध नोंदविला असून शनिवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता शालिमार आयएमए येथून मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढून निवेदन दिले जाणार असून, ओपीडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.