मालेगावी अज्ञाताच्या गोळीबारात महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:02 AM2020-01-17T02:02:18+5:302020-01-17T02:02:46+5:30
मालेगाव शहरालगतच्या भावगाव शिवारातील संविधान नगरमध्ये दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने बंगल्यात घुसून ज्योती भटू डोंगरे (३६) या महिलेवर गोळीबार केला. त्यात डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला.
मालेगाव : शहरालगतच्या भावगाव शिवारातील संविधान नगरमध्ये दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने बंगल्यात घुसून ज्योती भटू डोंगरे (३६) या महिलेवर गोळीबार केला. त्यात डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. वडनेर खाकुर्डी पोलिसात रात्री उशिरापर्यंत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली.
भायगाव शिवारातील संविधाननगर भागात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडला. ज्योती डोंगरे बंगल्यात एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने खोलीत प्रवेश करून ज्योती डोंगरे यांच्यावर दोन काडतुसे झाडली. फायरींगमुळे मोठा आवाज झाला. आजूबाजूच्या नागरिकांना काही समजण्याच्या आत अनोळखी व्यक्तीने गल्लीतून काटेरी झुडपांकडे पळ काढला. घटनेची माहिती कॅम्प व वडनेर खाकुर्डी पोलिसांना कळल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शशिकांत शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु, वडनेर खाकुर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोताळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
मृत महिलेचे पती जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
ज्योती डोंगरे यांच्या कुटुंबिय व नातलगांनी हंबरडा फोडला होता. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. या घटनेमुळे संविधाननगर भागात काहीकाळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशीरा सामान्य रुग्णालयात ज्योती डोंगरे यांचे शवविच्छेदन करण्यात आले.