सौभाग्याचं लेणं झालं असुरक्षित; नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:30 PM2017-12-18T15:30:03+5:302017-12-18T15:32:09+5:30
नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील चार घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे सोने चोरट्यांनी पळवून नेल्याने संताप व्यक्त होत आहे.
सोनसाखळी चोरीसाठी चोरट्यांनी अशोकामार्गाला लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे या मार्गावर पोलीस चौकी आहे व गस्त पथकाची वाहने सातत्याने या भागात गस्तीवर असतात तरीदेखील सोनसाखळी चोरीच्या घटना दरमहा या परिसरात होत असल्याने संतापाबरोबर आश्चर्य व्यक्त होत आहे. कल्पतरू उद्यानाच्या परिसरात नारायणनगर भागात राहणा-या राजकुमारी देवेंद्रसिंग ठाकूर (३५) या त्यांच्या मुलीसमवेत पायी घराकडे येत असताना चोरट्यांनी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येत समोरून ठाकूर यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना रात्री साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ठाकूर यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध ३० हजार रुपये किमतीची सोन्याचे पान असलेली सोनसाखळी लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुस-या घटनेत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरील घटनेशी साम्य असलेल्या भामट्यांनी दुचाकीवरून येत वासननगर परिसरात मंदा कैलास आहिरे यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची ५० ग्रॅमची सोनसाखळी ओरबाडून पळ काढला. सदर घटना आठ वाजेच्या सुमारास घडली असून, आहिरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तिस-या घटनेत चोरट्यांनी भरदुपारी जेलरोड भागात गंधर्वनगरीत एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील पावणे चार तोळे वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. उपनगर पोलिसांत वेरोणिका कदम (६५, रा. डीजीपीनगर १) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. चौथी घटना गोदाकाठावर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. कर्नाटकहून आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्यांनी पळ काढला.
पादचारीसह दुचाकीवरील महिलाही ‘टार्गेट’
सोनसाखळी चोरट्यांची मजल वाढली आहे. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºया महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांनी दुचाकीवरून जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीही पळवून नेण्याचे धाडस केल्याचे समोर आले आहे. जेलरोडवरील गंधर्वनगरी परिसरात अॅक्टीवावरून पतीसमवेत जात असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी अशा पद्धतीने हिसकावून पळ काढला.