रेबीज लसीकरणाकडील दुर्लक्षामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
By Admin | Published: March 6, 2017 12:56 AM2017-03-06T00:56:30+5:302017-03-06T00:56:38+5:30
नाशिक : कुत्रा चावल्यानंतर करावा लागणाऱ्या कोर्सपैकी पहिले इंजेक्शन घेतले, मात्र त्यानंतर पुढील कोर्सकडे दुर्लक्ष केल्याने चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली़
नाशिक : कुत्रा चावल्यानंतर करावा लागणाऱ्या कोर्सपैकी पहिले इंजेक्शन घेतले, मात्र त्यानंतर पुढील कोर्सकडे दुर्लक्ष केल्याने सव्वातीन वर्षांच्या चिमुरड्याचा रविवारी (दि़५) उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली़ मयत चिमुकल्याचे नाव समीर केदू वाघ ( रा. हिरावाडी, पंचवटी) असे असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे़
हिरावाडी परिसरात राहणाऱ्या समीर वाघ या सव्वातीन वर्षांच्या चिमुरड्यास काही महिन्यांपूर्वी घराजवळच कुत्र्याने चावा घेतला़ त्यानंतर त्याच्या पालकांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणून रेबीज कोर्सचे पहिले इंजेक्शन दिले़ यानंतर या कोर्सनुसार ठराविक दिवसांच्या अंतराने पुढील इंजेक्शन देण्यासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणणे आवश्यक असताना पालकांनी याकडे दुर्लक्ष केले़ दोन दिवसांपूर्वी चिमुकल्या समीरला त्रास होऊ लागल्याने त्याच्या पालकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ त्याच्या पालकांनी वेळीच त्याच्याकडे लक्ष देऊन रेबीज इंजेक्शनचा कोर्स केला असता तर तो वाचला असता असे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़ दरम्यान, या घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)