तपोवनातील खुन प्रकरणाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश ; संशयित अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 07:31 PM2020-08-07T19:31:19+5:302020-08-07T19:35:06+5:30
नाशिकच्या तपोवन परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ५० वर्षीय इसमाचा कोणीतरी अज्ञात संशयितांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपीने पलायन केले होते. या घटनेचा तपास करीत खुनाचे रहस्य उलगडले आहे. संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी केले तपासात दारूच्या नशेत शाब्दिक वादातून गोपालदास आश्रमात येणाऱ्या संतोष रामकृष्ण पवार याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
नाशिक : तपोवनात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ५० वर्षीय इसमाचा कोणीतरी अज्ञात संशयितांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपीने पलायन केले होते. परंतु, पोलिसांनी या घटनेचा तपास करीत खुनाचे रहस्य उलगडले असून दारूच्या नशेत शाब्दिक वादातून गोपालदास आश्रमात येणाऱ्या संतोष रामकृष्ण पवार याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
तपोवणात पाच दिवसांपूर्वी हिरावाडी परिसरात राहणाऱ्या पवारचा डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना घडली होती. या खून प्रकरणी चुंचाळे शिवारातील संजूनगर येथे रवि उर्फ पिंट्या तुकाराम लिलके याला आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पवार याचा खून कोणी व का केला याचे मुख्य कारण गुलदस्त्यात होते. तसेच संशयित आरोपींना गजाआड करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे या खुनाचा आडगाव पोलीस कसून तपास करीत असतांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना काही धागेदोरे मिळाले आणि त्यातून पिंट्या लिलके या संशयिताचे नाव पुढे आले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. सी. तोडकर, उपनिरीक्षक धैर्यशिल घाडगे, पोलिस हवालदार राजाभाऊ गांगुर्डे, वाल्मिक सुर्यवंशी, योगेश घुगे, जगदीश पाटील आदींनी लिलकेला मुंबईनाका परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने दिलेल्या जबाबानुसार, सोमवारी रात्री पवार व लिलके दोघे दारू पिलेले होते. दारूच्या नशेत असलेल्या पवार याने लिलके याला फटका मारून तुझी माज्या बरोबर राहायची लायकी नाही, असे म्हणत वाद घातला होता. त्यामुळे संतापलेल्या लिलकेने राग अनावर झाल्याने पवारचा काटा काढायचे ठरविले व रात्री पवारच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.