मालवाहू रिक्षाचालकाच्या खुनाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 01:47 AM2022-07-15T01:47:35+5:302022-07-15T01:47:57+5:30
मालवाहू रिक्षाचालक असलेल्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी मालवाहू रिक्षाचालकाचा दोन महिन्यांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खुनामागे अत्यंत क्षुल्लक असे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहे. शुभम ऊर्फ बबलू सुरेश पवार (वय २४, रा. जवाहरनगर, दाभाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
नाशिक : मालवाहू रिक्षाचालक असलेल्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी मालवाहू रिक्षाचालकाचा दोन महिन्यांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खुनामागे अत्यंत क्षुल्लक असे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहे. शुभम ऊर्फ बबलू सुरेश पवार (वय २४, रा. जवाहरनगर, दाभाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
ॲपे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पंकज सुभाष मानकर (२४) या युवकाचा मृतदेह वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळाशी शिवारात २१ मे रोजी आढळला होता. पंकज यास जबर मारहाण करत धारधार शस्त्राने वार करून ठार मारल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांना घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर ॲपे रिक्षा आढळली होती. ही रिक्षा पंकजची असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला गती दिली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश देत पथक तयार केले. सहायक निरीक्षक देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने धागेदोरे जुळवत पंकज मानकर यांच्याविषयी दाभाडी गावातून माहिती मिळविली. पंकज हा मृत्यूपूर्वी त्याची मालवाहू रिक्षा घेऊन अजंगमार्गे गेला असल्याची माहिती तपासात पुढे आली. अजंग रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांच्या पथकाने पडताळणी केली. काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिक्षाच्या मागे एका काळ्या रंगाच्या दुचाकीने दुचाकीचालक पाठलाग करत असल्याचे दिसले. पोलिसांनी दुचाकीची ओळख पटवून संशयित शुभम यास दाभाडी गावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देत खुनाच्या आठवडाभरापूर्वी पंकज याने ॲप रिक्षाद्वारे शुभमच्या दुचाकीला कट मारला होता. या कारणावरून दोघांमध्ये शिवीगाळ होऊन शाब्दिक वाद झाले होते. या रागातून त्याने खून केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.