छोट्या विक्रेत्यांकडून अवास्तव भाडेवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:20+5:302021-08-24T04:19:20+5:30
शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, शेतकरी तसेच इतर फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून अवाजवी पावती वसूल करत असल्याची तक्रारी होत आहे. ...
शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, शेतकरी तसेच इतर फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून अवाजवी पावती वसूल करत असल्याची तक्रारी होत आहे. त्यातच एक वृद्ध व्यावसायिक महिलेकडून १०० रुपयांची पावती वसुली केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शहरातील बाजार पटांगणात बाजार भरण्यास शासनाने परवानगी दिलेली नसल्याने पालखेड रोड, उमराळे रोड, जुना कळवण रोड आदी रस्त्यांच्या बाजूला भाजीपाला, फळ विक्री तसेच इतर व्यवसाय सुरू आहेत. गेले काही दिवस बाजार वसुली सुरू नव्हती. मात्र, नुकतीच बाजार वसुली सुरू करण्यात आली आहे. सदर वसुलीबाबत तक्रारी सुरू झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे रविवारी याबाबत भाजप नेते बाबूशेठ मणियार व व्यावसायिकांनी निवेदनाद्वारे अवास्तव वसुली केली जाते व पावती दिली जात नाही, अशी तक्रार केली होती.
इन्फो
कारवाईचे आश्वासन
याबाबत नगर पंचायत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकारची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. तर बाजार पटांगणात पूर्वीप्रमाणे भाजीपाला बाजार सुरू करून शेतकरी व्यावसायिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नियमानुसार वाजवी भाडे पावती आकारावी, अशी मागणी व्यावसायिक व ग्रामस्थांनी केली आहे.