ग्रामपंचायतीकडून व्यापाऱ्यांच्या शेडला अवास्तव कर आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:30 PM2020-12-25T19:30:04+5:302020-12-26T00:42:12+5:30

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामीण भागातील उपबाजार आवारात व्यापाऱ्यांनी उभारलेल्या तात्पुरत्या शेडला स्थानिक ग्रामपंचायतींकडून अवास्तव कर आकारणी करण्यात येत असून, व्यापार्‍यांनी कर भरण्यास असमर्थता व्यक्त केल्याने बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव शेळके यांनी गटविकास अधिकारी एम.बी. मुरकुटे यांना निवेदन देऊन योग्य कर आकारणीच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्याबाबत साकडे घातले.

Unrealistic taxation of traders' sheds by Gram Panchayat | ग्रामपंचायतीकडून व्यापाऱ्यांच्या शेडला अवास्तव कर आकारणी

ग्रामपंचायतीकडून व्यापाऱ्यांच्या शेडला अवास्तव कर आकारणी

Next
ठळक मुद्दे सिन्नर : बाजार समिती सभापतींचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर ही निमशासकीय संस्था असून, समितीचे कामकाज महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री नियम अधिनियम १९६३ अन्वये चालते. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वजनमाप हे बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांचे देखरेखी खाली व्हावे, वजनमापात शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये, शेतमालाला योग्य व वाजवी दर मिळावा या कारणास्तव शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल खाली करून घेण्यासाठी बाजार आवारांमध्ये प्लॉट दिलेले आहे. या प्लॉटवर शेतकर्‍यांकडून खरेदी केलेला शेतमाल उतरवून घेतला जातो. शेतमालाचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी खरेदीदार व्यापाऱ्यांनी लोखंडी पत्रे, अँगल यामध्ये तात्पुरत्या स्वरुपातील शेडची उभारणी केली आहे. अशा उभारलेल्या शेडला स्थानिक ग्रामपंचायत यांनी अवास्तव करपट्टीची आकारणी केलेली आहे. व्यापार्‍यांनी अवास्तव कर भरण्यास नकार देऊन बाजार समितीकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. परिणामी संबंधित ग्रामपंचायती व बाजार समिती यांच्यात अकारण वादाचे प्रसंगदेखील यापूर्वी उद‌्भवले आहेत. त्याचे निराकरण होऊन बाजार समितीस व संबंधित खरेदीदार व्यापारी यांना योग्य व रास्त करपट्टीची आकारणी करून नोटिसा द्याव्यात यावी, अशी मागणी शेळके यांनी गटविकास अधिकारी मुरकुटे यांच्याकडे केली. त्यावर मुरकुटे यांनी लवकरच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही सभापती शेळके यांना दिली. याप्रसंगी बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव राजेंद्र जाधव उपस्थित होते

Web Title: Unrealistic taxation of traders' sheds by Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.