असुरक्षित शालेय विद्यार्थी वाहतूक
By admin | Published: June 25, 2016 10:11 PM2016-06-25T22:11:58+5:302016-06-26T00:32:29+5:30
परवान्याकडे दुर्लक्ष : जिवाला घोर, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहनात; सुरक्षा धोक्यात
नाशिक : शालेय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत कायदा धाब्यावर बसवून शहरात विनापरवाना अवैध शालेय वाहतुकीचा धंदा ‘सर्रास’ सुरू आहे. अवैध वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्याही जिवाला घोर लागत आहे; मात्र याचे संबंधित प्रशासकीय यंत्रणेला कुठलेही गांभीर्य नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शाळा व्यवस्थापन, प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक पोलिसांकडून अवैध प्रवासी वाहतुकीकडे काणाडोळा केला जात असल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांचे फावले आहे. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून बहुतांश ओम्नीचालक, रिक्षाचालक शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. असुरक्षित शालेय वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी वाढत असल्याने शहरात शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बहुतांश वाहनचालक ांकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शालेय प्रवासी वाहतूक करण्याचा परवानाच नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनी परवाने नूतनीकरणही केलेले नाही. विनापरवाना शालेय वाहतूक प्रशासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून केली जात आहे. शालेय वाहतुकीसंदर्भात राज्य शासनाने २०११ साली अध्यादेश जाहीर केलेला आहे; मात्र याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही.