साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

By admin | Published: September 10, 2014 01:29 AM2014-09-10T01:29:13+5:302014-09-10T01:49:32+5:30

साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

Unsatisfied with one favored rest in most parties ... | साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

Next


महापालिकेत कोणतीही निवडणूक म्हटली की सर्वच पक्षांत कायम इच्छुक असणाऱ्यांचा एक संचच असतो. तो साऱ्याच निवडणुकांना इच्छुक असतो. निवडणुकीत अधिकृत उमेदवारी मिळणे वेगळे असले, तरी अनेकदा केवळ दावेदार राहणे हेदेखील महत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. अर्थात, पालिकेत एक जुन्या जाणत्या मंडळींचे एक कोंडाळे आहे. अन्य नवागत मंडळींना मोक्याच्या जागा मिळू देत नाही, हीदेखील भावना आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. किंबहुना महापौरपदासाठी आरक्षण घोषित झाले तेव्हा बडगुजर यांची दावेदारी मानली जात होती. त्यांचे वरिष्ठ पातळीवर संबंध असल्यामुळे विधानसभेसाठी आपले नाव सुचवावे यासाठी अनेक इच्छुकांनी बडगुजर यांच्या नावाला टेकू लावला. त्यामुळे सेनेत बडगुजर यांच्यावरूनही राजी-नाराजीचे वातावरण होते. सकाळी पक्षश्रेष्ठींनी केवळ बडगुजर हेच उमेदवारी दाखल करतील म्हटल्यानंतर शिवसेना कार्यालयात त्याची प्रतिक्रिया उमटली. शैलेश ढगे आणि अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचे किमान अर्ज दाखल करू द्या ही विनवणी नाकारल्याने ते नाराज झाले. असाच प्रकार भाजपातही झाला. वसंत स्मृती येथे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत गटनेता संभाजी मोरूस्कर यांना उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्यास सांगितल्यानंतर कमलेश बोडके यांच्यासह काही नगरसेवकांनी ओरड केली. प्रस्थापित नगरसेवक पदांची अदलाबदल करून पदे घेतात; आता उपमहापौर सतीश कुलकर्णी पदावरून उतरल्यावर त्यांना गटनेता करणार का, असा प्रश्न त्यांनी केला. इतकेच नव्हे, तर बंड करण्याची तयारी दर्शविल्यानंतर फुलावती बोडके, सिंधू खोडे आणि ज्योती गांगुर्डे यांचे अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. कॉँग्रेसमध्ये उपमहापौरपदासाठी राहुल दिवे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्याचा ‘आदेश’ श्रेष्ठींनी दिल्यानंतर सारीच पदे एका व्यक्तीला देणार काय म्हणत अन्य काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे लक्ष्मण जायभावे, विमल पाटील यांना अर्ज दाखल करू देण्यात आला. मनसेत तर
राज ठाकरे यांच्याच आदेशाला बगल देण्यात आली. महापौरपदासाठी संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून पाच ते सहा जणांना नाशिकमध्ये धाडण्यात आले होते. ‘रामायण’वर ही मंडळी पोहोचली व बैठक झाली.
त्यानंतर सभागृह नेता शशिकांत जाधव आणि सुदाम कोंबडे या दोघांचेच अर्ज दाखल करण्याचे आदेश आले होते. परंतु ऐनवेळी आधी अशोक मुर्तडक यांचाही अर्ज दाखल करण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मग, मुर्तडकच सलीम शेख यांचाही अर्ज का भरत नाही, असा प्रश्न करीत त्यांचे एक नाव पुढे करण्यात आले. पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी असा प्रकार केल्याने अन्य इच्छुकांना नाराजी जाहीर करता आली नाही आणि आल्या पावली मुंबईत कॅम्पसाठी परतावे लागले. उमेदवारी कोणा तरी एकाला मिळणार, त्यासाठी संबंधित इच्छुक वरील नेते कसे मॅनेज करतात, यावर सारे ठरलेले असते. परंतु नेहमी डावलल्या जाणाऱ्यांच्या भावनांना वेळीच आवर घातला नाही तर कधी ना कधी त्याचा स्फोट होणारच.
- संजय पाठक

Web Title: Unsatisfied with one favored rest in most parties ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.