अवकाळी पावसाने मोडला अर्थिक कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:56 PM2021-01-16T16:56:55+5:302021-01-16T16:57:48+5:30

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपुर्वी अवकाळी व बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने तालुक्याचा आर्थिक कणा मोडला आहे.

The unseasonal rains broke the economic backbone | अवकाळी पावसाने मोडला अर्थिक कणा

अवकाळी पावसाने मोडला अर्थिक कणा

Next
ठळक मुद्देनुकसानीत वाढ : द्राक्षे उत्पादक, विटभट्टीचालक देशोधडीला

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपुर्वी अवकाळी व बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने तालुक्याचा आर्थिक कणा मोडला आहे.
तालुक्याला द्राक्षे उत्पादक क्षेत्रातील द्राक्षेपंढरी या नावाने सर्वत्र ओळखले जाते. परंतु या द्राक्षेपंढरीला निसर्गाच्या वक्रदृष्टीचे एकप्रकारे ग्रहण लागले आहे. मागील हंगाम कोरोनामुळे वाया गेला. आता या हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, या आशेवर तग धरून बळीराजाने मिळेल त्या ठिकाणाहून भांडवल उभे करून द्राक्षे हंगामास सुरुवात केली. परंतु अस्मानी संकटाचा घाला घातला व होत्याचे नव्हते करून टाकले.
या अवकाळी पावसाने अंतिम टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष बागा पुर्णपणे तडे गेल्यामुळे मोठ्या आर्थिक हानीचा फटका शेतकरी वर्गाला बसला. या अवकाळी पावसाने तोंडाजवळ आलेला उत्पन्नांचा भाग निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे हिरावून गेला.
दिंडोरी तालुक्यात जवळ जवळ ७० टक्के द्राक्षबागा आहेत. परंतु दोन ते तीन वर्षापासुन अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, परतीचा पाऊस, कोरोना, बेमोसमी पडणारा पाऊस आदींमुळे प्रत्येक हंगामात शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे.

अवकाळी पावसाने लखमापुर, पिंपरखेड, नळवाडी, करजंवण, अवनखेड, दहेगाव, वागळूद आदी गावांना मोठा धक्का दिला आहे. यामध्ये जवळपास कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले असून परत एकदा या द्राक्षे पंढरीतील बळीराजांवर आर्थिक संकटांची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे विविध बँका, सहकारी सोसायटी, पतसंस्था, व इतर ठिकाणांहून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या समस्यांनी शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
ज्या द्राक्षे बागांच्या घडांना तडे गेलेले आहेत. त्यांना घेण्यासाठी द्राक्षे व्यापारी वर्ग आपली नापसंती दाखवित असल्याने आता पुढे काय? असा सवाल शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे.
नैसर्गिक आपत्तीने झालेले नुकसान कसे भरून मिळेल याकडे सर्व शेतकरी वर्गाच्या नजरा लागल्या आहेत.
गहु, हरभरा व इतर नगदी भांडवल देणा-या पिकांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने यंदा या पिकांच्या उत्पादन क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा या पिकांची जी सरासरी मिळते. ती मिळणे आता शक्य नाही. असे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.
दिंडोरी तालुक्यात लखमापुर, करजंवण, दिंडोरी, नाळेगाव, वरखेडा इ्यादी गावांमध्ये विटभट्टी मोठ्या प्रमाणावर आहे. दोन वेळा झालेल्या अवकाळी पावसाने तयार केलेल्या कच्च्या विटा पुर्णपणे जमीनदोस्त करून टाकल्या आहेत. त्यामुळे विटभट्टीचालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता कच्च्या मालाचे पैसे, मजुरी कशी फेडावी ही समस्या विटभट्टीचालकांना भेडसावत आहे.
मागील हंगाम कोरोनामुळे वाया गेला. त्यात एक वर्षभर एक पैसाही हातात आला नाही. आता व्यवसाय सुरू झाला आणि निसर्गाच्या वक्रदृष्टीने तेही हिरावून घेतल्याने विटभट्टीचालक याही वर्षी आर्थिक संकटाच्या दरीत कोसळले आहे. या अवकाळी व बेमोसमी पावसाने जवळजवळ दिंडोरी तालुक्यातील आर्थिक कणाच मोडला आहे.

मागील तीन चार वर्षांपासून द्राक्षे पिकांने साथ दिली नाही. परंतु यंदा मिळेल त्या ठिकाणाहून भांडवल उभे करून मोठ्या मेहनतीने द्राक्षे बागा तयार केल्या व मनासारखे पिकही आले. परंतु अवकाळी पावसाने संपूर्ण द्राक्षे घडांना तडे गेल्याने आमचे भांडवल, मजुरी, केलेला खर्च पुर्णपणे मातीला मिळाळा. आम्ही परत एकदा आर्थिक संकटांच्या दरीत सापडलो आहोत.
- मनोज राजदेव, शेतकरी, लखमापुर.  

Web Title: The unseasonal rains broke the economic backbone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.