बेमोसमी पावसाने शेतकरी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:40 PM2020-11-20T21:40:14+5:302020-11-21T00:52:54+5:30
सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला.
सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला.
कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याची संकटांनी यंदाही पाठ सोडलेली नाही. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शेतकर्यांना खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने जेरीस आणले आहे. दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस कोसळत असतानाच द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. शेतकऱ्यांच्या अनेक बागा दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेत आहे. दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असणाऱ्या बागांना पाणी जास्त झाल्यास त्याची गळ आणि कूज होते. ढगाळ हवामानाचा फटका द्राक्षबागांना बसतो. गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने द्राक्षबागांना पुरेसे ऊन मिळत नाही. त्यामुळे भागांची गळ, कूच होऊ लागली आहे निफाड तालुक्यातील ३५ टक्के द्राक्षबागा गळीने खराब झाल्या आहेत. यामुळे द्राक्ष पंढरीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे यंदा रोपांचा तुटवडा झालेला कांद्याच्या लागवडी घट झाली आहे लागवड केलेला कांदा पुन्हा पावसात सापडल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कांद्याचे उत्पादनात घट होणार आहे. पहाटे झालेल्या पावसात शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी तुंबले. कांद्याचे वाफे, द्राक्ष बागाच्या गल्ल्या आणि भाजीपाला या ठिकाणी पाणी तुंबल्याने सर्वच पिकांची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कधी अवकाळी पाऊस तर कधी गारांचा फटका, बेभावात विकणारा शेतमाल यामुळे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी होत चालला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्व पिके शेतामध्ये बहरलेला असतानाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करून टाकले.