नाशिक जिल्ह्यात १३०० हेक्टरवर अवकाळीचा फटका कांदा, द्राक्षाला फटका; कृषी मंत्र्यांकडून पंचनाम्याचे निर्देश
By दिनेश पाठक | Updated: April 4, 2025 18:07 IST2025-04-04T18:06:13+5:302025-04-04T18:07:36+5:30
शहर आणि तालुक्यात दोन दिवस अवकाळी पाऊस झाल्याने शेतमालाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हरसूल भागात शेकडो एकर केशर आंबा लागवड झालेली आहे.

नाशिक जिल्ह्यात १३०० हेक्टरवर अवकाळीचा फटका कांदा, द्राक्षाला फटका; कृषी मंत्र्यांकडून पंचनाम्याचे निर्देश
दिनेश पाठक
नाशिक : जिल्ह्यात दोन दिवस झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका शेतपिकांना बसला. १३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात सर्वाधिक नुकसान बागलाण तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. द्राक्ष, उन्हाळ कांदा, डाळिंब यासह भाजीपाला व टोमॅटोचे सर्वाधिक नुकसान झाले.
शहर आणि तालुक्यात दोन दिवस अवकाळी पाऊस झाल्याने शेतमालाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हरसूल भागात शेकडो एकर केशर आंबा लागवड झालेली आहे. काही भागात फळ धरण्यास सुरुवात झालेली आहे, तर काही भागातील केशर आंबा बाजारपेठेत येण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच अवकाळी पावसाने दणका दिल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले.
नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, बागलाण, सिन्नर, येवला व इतर काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले. गारपिटीसह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीने जिल्ह्यातील ३० गावांना झोडपले. बागलाणमध्ये १ हजार १५५ हेक्टर, कळवणला ७५ हेक्टर, दिंडोरी १५ हेक्टर, तर नाशिक तालुक्यात ४२.६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात ६०.६० हेक्टरवरील भाजीपाला पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. डाळिंब १९.६० हेक्टर, द्राक्ष १९.८० हेक्टर, टोमॅटो १० व गव्हाचे दहा हेक्टर इतके नुकसान नोंदविण्यात आले आहे.