नांदूरशिंगोटे परिसरात बेमोसमी पावसामुळे पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 05:22 PM2021-01-10T17:22:23+5:302021-01-10T17:22:58+5:30
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात शनिवारी सायंकाळी व रात्रीच्या सुमारास बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. प्रामुख्याने काढणीला आलेल्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हिवाळ्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.
Next
बेमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका परिसरातील गावांना बसला आहे. गुरुवार, शुक्रवार व शनिवारी या तिन्ही दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. शेतात पाणी साचल्याने कांदा पीक उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी कांद्याच्या वाफ्यांंमध्ये साचलेले होते. त्यातच लाल कांदा काही ठिकाणी काढणीला आलेला असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाला झळ सोसावी लागत आहे. शनिवारी सायंकाळी नांदूरशिंगोटे, दोडी, दापूर, गोंदे, खंबाळे, मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे, सोनेवाडी, दातली आदी भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावली.