अवकाळी पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:42 AM2021-01-08T01:42:30+5:302021-01-08T01:42:54+5:30
कडाक्याच्या थंडीचा जोर कमी होऊन मागील चार दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि उष्मा जाणवत असताना गुरुवारी दुपारी दीड वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसाने शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली.
नाशिक : कडाक्याच्या थंडीचा जोर कमी होऊन मागील चार दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि उष्मा जाणवत असताना गुरुवारी दुपारी दीड वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसाने शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. अरबी समुद्राच्या दक्षिणेला निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापला गेला आहे. त्यामुळे पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, १७.४ अंशापर्यंत पारा वर सरकला आहे. तसेच शहरात आर्द्रतेचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढल्याने पहाटे शहरावर धुक्याची दुलई पसरते. गुरुवारी अचानकपणे दुपारपासून शहरावर ढग दाटून आले आणि कोठे हलक्या तर कोठे मध्यम स्वरुपाच्या सरींचा वर्षाव सुरू झाला.
n अंबड, सिडको, इंदिरानगर, वडाळागाव, उपनगर, जेलरोड, अशोका मार्ग, जुने नाशिक, पंचवटी, अशोकस्तंभ, गंगापूररोडसह सर्वच भागांमध्ये पावसाने संध्याकाळी उशिरापर्यंत हजेरी लावली. दुपारी साडेचार वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती परिसरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा साडेसहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत जोरदार सरी कोसळल्या. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५.७ मिमी इतका पाऊस मोजला गेला.
पंचवटीत पावसामुळे रस्ते ओलेचिंब
गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. पंचवटी परिसरातील सर्वच रस्ते ओलेचिंब झाल्याचे दिसून आले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यातच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती.
नाशिकरोड
परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याचे तळे साचल्याने रहिवासी, विक्रेते, दुकानदार यांना भूमिगत गटारीची झाकणे उघडून पावसाचे साचलेले पाणी मार्गस्थ करण्याची वेळ आली. नाशिकरोड परिसरामध्ये गुरुवारी दुपारी जवळपास दीड तास मुसळधार अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने सर्वांची धांदल उडाली होती.
एकलहरे
परिसरात गुरुवारी (दि.७) दुपारनंतर धुवाधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी व भाजीपाला व्यावसायिकांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसाचे पाणी शेतात साचल्याने निंदणी थांबली आहे. परिणामी पिकांमध्ये गवत, तण वाढून पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.