नाशकात रिमझिम सरींचा बेमोसमी वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:51+5:302020-12-13T04:30:51+5:30
अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा ...
अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा यामुळे वातावरणात कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. वाऱ्यांची दिशा बदलली असून, वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील दोन दिवसांपासून नाशिककरांना सूर्यदर्शनही घडलेले नाही. या वातावरण बदलामुळे बळीराजा धास्तावला आहे. कांदा, द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. द्राक्ष बागायतदारांनी डावणी रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य औषध फवारणी तसेच बागांमध्ये शेकोट्या पेटवून याेग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान केंद्राकडून करण्यात आले आहे.
शहरात हवामान बदलामुळे वातावरणात बाष्प व आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. सकाळी हवेत ८१ तर संध्याकाळीसुद्धा ८० टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसत आहे. यामुळे नाशिककरांना विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे. वातावरण थंड झाल्यामुळे गोदाघाटावर तसेच शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये शनिवारी संध्याकाळी शेकोट्या पेटल्याचे चित्र पहावयास मिळाले. नाशिककरांनी थंडीचा बचाव करण्यासाठी चक्क संध्याकाळी सहा वाजताच गोदाकाठालगत राहणाऱ्या फिरस्त्यांकडून शेकोटी पेटविली होती.
---इन्फो--
दोन दिवसांत आकाश निरभ्र होण्याची शक्यता
पुढील दोन दिवसांमध्ये वातावरण स्वच्छ होऊन आकाश निरभ्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान केंद्रप्रमुख सुनील काळभोर यांनी वर्तविला आहे. दिवसाप्रमाणे रात्रीसुद्धा आकाशात ढग दाटून राहत असल्यामुळे किमान तापमानाचा पाराही घसरण्याऐवजी वाढत आहे तर दुसरीकडे कमाल तापमानाचा पारा घसरत असल्याने नाशिककरांना दिवसाही वातावरणात गारठा जाणवत आहे.