चांदवड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 06:46 PM2019-01-01T18:46:57+5:302019-01-01T18:47:55+5:30
राज्यातील नवनिर्मित नगरपरिषदेमध्ये पुर्वीच्या ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचाºयांचे समायोजन करणे व नवनिर्मित नगरपरिषद कर्मचा-यांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढल्यानंतर १ जानेवारीपासून चांदवड नगरपरिषदेतील सुमारे ४० कर्मचा-यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
सकाळी नगरपरिषदेच्या या कर्मचाºयांनी चांदवड येथील आठवडेबाजारापासून मोर्चा काढून चांदवड नगरपरिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलनास प्रारंभ केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री व नगरविकास सचिव, नगरपलिका प्रशासन, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने ग्रामपंचायतीचे नव्याने नगरपरिषदांमध्ये रुपांतर केले. पुर्वीच्या ग्रामपंचायतींमध्ये जे कर्मचारी, सफाई, कर्मचारी, संगणक आॅपरेटर पाणीपुरवठा व इतर सर्व विभागातील कर्मचारी अनेक वर्ष काम करीत असून त्यांचा विना अट त्या पदावर किंवा अन्य पदांवर समावेश करण्यात यावा, समावेशापूर्वी मयत झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळावा, सेवेत असतांना कर्मचारी मयत झालेला असल्यास त्याच्या वारसांना वारसा हक्काने अथवा अनुकंपाखाली नोकरी मिळावी, नगरपंचायतीमधील कर्मचा-यांची सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्रामपंचायतीची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, कर्मचा-यांना बोनस अथवा सानुग्रह अनुदान देण्यात यावे, ठेकेदाराकडील कर्मचा-यांना अथवा कंत्राटी रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम करेपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे, सफाई कामगारांना शासकीय सेवेत सामावुन घेण्यात यावे, प्रथम उद्घोषणानंतर सेवेत घेण्यात आलेल्या कर्मचा-यांचे समावेशन करण्यात यावे, तत्कालीन ग्रामपंचायतीत ज्या पदावर कर्मचारी सेवेत कायम होता त्याच पदावर त्याचे नगरपंचायत सेवेत समावेशन करण्यात यावे, रोजंदारी कर्मचा-यांना सेवेत सामावुन घेण्यात येऊन त्यांचे समावेशन व्हावे,मागील सेवा खंडित न करता सेवा कायम करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे काम बंद बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात चांदवड शहर अध्यक्ष अनिल गायकवाड, सरचिटणीस शरद धोतरे , उपाध्यक्ष कामिनीबाई सौदे, लहानु बनकर, बाळु कापडणी, शांताराम उगले, सुनील गायकवाड, श्रावण कापसे, संतोष सौदे, ज्योती सौदे, मुक्ताबाई बनकर, कुसुम वाग, रत्नाबाई अहिरे, कल्पना बनकर, सुनीता शेजवळ, मंदा पवार, उज्वला जाधव, रमाबाई बनकर आदिंसह चाळीस कर्मचाºयांचा समावेश आहे.