सिन्नरला अवकाळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:36+5:302021-03-24T04:13:36+5:30
सिन्नर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तत्काळ पंचनामे ...
सिन्नर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सिन्नर पंचायत समितीच्या सभापती शोभा दीपक बर्के यांनी केली आहे. कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणीही बर्के यांनी निवेदनात केली आहे. तालुक्यातील बहुतेक ठिकाणी रविवारी व सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे, असेही सभापती बर्के यांनी म्हटले आहे. तालुक्यात गहू व कांदा या पिकांचे पंधराशेहून अधिक हेक्टवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेला गहू, हरभरा, उन्हाळ बाजरी, कांदा तसेच फळबांगाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोनाचे संकट, शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. असे असतानाच आता पुन्हा गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी बर्के यांनी केली आहे.
-------------------
२० ते २५ गावांमध्ये नुकसान
रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील २० ते २५ गावांना फटका बसला आहे. दापूर, गोंदे, शिवाजीनगर, दत्तनगर, खंबाळे, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, कोळगावमाळ, सायाळे, मलढोण, मऱ्हळ, वावी, कहांडळवाडी, पिंपरवाडी, मिरगाव, दोडी बुद्रक, दोडी खुर्द, निऱ्हाळे, कणकोरी, नांदूरशिंगोटे, चापडगाव आदी भागात पावसाचा तडाखा बसला.
-------------
कांदा व फळबागांचे नुकसान
दापूर व परिसराला दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा तडाखा बसला. परिसरात डाळिंबबागांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. अवकाळी पावसाचा मोठा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच या भागात यावर्षीही कांदा पिकांची चांगल्या प्रमाणात लागवड होती. परंतु गारपिटीने सर्वच पिकांची नासाडी झाली आहे.