जिल्ह्यातील डॉक्टरांचा बेमुदत संप

By admin | Published: March 23, 2017 01:52 AM2017-03-23T01:52:53+5:302017-03-23T01:53:04+5:30

नाशिक : राज्यभरात विविध घटनांमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात शहरातील डॉक्टरांनी बुधवारी (दि. २२) रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Untimely death of doctors in the district | जिल्ह्यातील डॉक्टरांचा बेमुदत संप

जिल्ह्यातील डॉक्टरांचा बेमुदत संप

Next

नाशिक : येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाच्या मृत्यूच्या घटनेनंतर व राज्यभरात विविध घटनांमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात शहरातील डॉक्टरांनी बुधवारी (दि. २२) रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या तपासणीसह सर्व औषधोपचार बंद राहणार असून, बुधवारी रात्रीपासून तीन दिवस अत्यावश्यक सेवाही बंद राहणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देण्यात आली.
गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूचा रुग्ण दगावल्याने येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना घडली असून, धुळ्यातही अशाप्रकारे डॉक्टरवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांनी आवाज उठवल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेसह जिल्ह्णातील सर्व वैद्यकीय संस्थांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व खासगी रुग्णालयांमधील बाह्ण रुग्ण विभाग, आंतररुग्ण सेवा या थांबविण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस सर्व अत्यावश्यक वैद्यकीय सेवाही बंद राहणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध भांडारकर यांनी दिली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत देवरे, डॉ. निवेदिता पवार, डॉ. राजश्री पाटील, डॉ. आवेश पलोड, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. सतीश पाटील यांच्यासह विविध रुग्णालयांतील डॉक्टर उपस्थित होते. या कालावधीत रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याचे आवाहनही आयएमए तर्फे करण्यात आले. (प्रतिनिधी)
पाठिंबा देण्याचे आवाहन
सहनशीलतेचा अंत झाल्याने नाईलाजास्तव अशाप्रकारचे कठोर पाऊल उचलावे लागत असून, सतत दडपणाखाली काम करणे अशक्य झाल्याने स्वसुरक्षिततेसाठी संप पुकारावा लागत असल्याचे डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट के ले. तसेच निकोप सामाजिक व्यवस्थेसाठी सुजाण नागरिकांनीही संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे.
डॉक्टरांना संरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बुधवार सायंकाळपासून संप पुकारला. त्याला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारपासून राज्यभरातील ४० हजार डॉक्टर बेमुदत बंद ठेवणार आहेत. परिणामी खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे सेंटर, सोनोग्राफी सेंटर बंद राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्यसेवा ठप्प होईल.
जिल्हा रुग्णालयाची सज्जता
आयएमए डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील यंत्रणा तयार असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात बाह्ण रुग्ण विभाग, अतिदक्षता आणि इमर्जन्सी विभागात वैद्यकीय अधिकारी २४ तास कार्यरत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर कोणताही ताण येणार नाही; मात्र इतर वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याने या काळात दक्ष राहण्याच्या सूचना डॉक्टरांना देण्यात आलेल्या आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका रुग्णालयांमध्येदेखील सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्वप्रकारच्या सुविधा आहेत. त्यामुळे कोणत्याही इमर्जन्सीसाठी पालिकेचे डॉक्टर्स तयार आहेत. तातडीच्या उपाययोजनांसाठी रुग्णालयाला सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Untimely death of doctors in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.