मानोरी परिसरात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:09+5:302021-01-09T04:11:09+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा, मुखेड परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दीड तास अवकाळी ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा, मुखेड परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दीड तास अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतात काम करत असलेल्या शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली. यामुळे हजारो हेक्टरवरील कांद्याचे आणि द्राक्षांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करताना शेतकरी दिसून येत आहे. अद्यापही अनेक ठिकाणी मंजुराअभावी कांदा लागवड बाकी असल्याने, महागड्या दराने घेतलेली कांद्याची रोपे आणि नव्याने केलेली उन्हाळ कांद्याच्या लागवडीला हा अवकाळी पाऊस नुकसानकारक ठरणार आहे. आधीच मजुरांची वानवा भासत असून, त्यात कांदा लागवडीचा दर हा एकरी दहा हजारांच्या घरात गेला असल्याने, हजारो रुपये खर्चून केलेली कांदा लागवड सध्या अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडली आहे.-----------------
निर्यातक्षम द्राक्ष तोडणीचा हंगाम लवकरच
निर्यातक्षम द्राक्ष तोडणीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, अचानक आलेल्या पावसाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला असून, हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस हिरावून नेतो की काय? याची धास्ती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागून आहे. मानोरी बुद्रुक व परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष बाग तयार करण्यासाठी भर देत असतात. यंदा सातत्याने वातावरणात बदल झाल्याने ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने औषध फवारणी करावी लागली आहे. पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, हा अवकाळी पाऊस जोराचा झाल्यास द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.