अवकाळी पावसाने प्रचाराचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 01:08 AM2021-01-11T01:08:31+5:302021-01-11T01:09:37+5:30
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रचाराचे फेरनियोजन केले जात आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे.
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रचाराचे फेरनियोजन केले जात आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे.
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११ हजार १०५ उमेदवार आपले नशीब आजमवीत आहेत. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार यंदा उमेदवारांना प्रचाराचा वेळ तसाही कमी मिळणार असल्याने, उमेदवारांनी माघारीच्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती, परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने उमेदवारांच्या मनसुब्यांवरही पाणी फिरले आहे. प्रचाराचे नियाेजन पावसामुळे कोलमडल्यामुळे कमी वेळेत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार असल्याने, उमेदवारांच्या हाती आता केवळ दोनच दिवस उरले आहेत.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक राजकीय नेते, तसेच स्थानिक पुढाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आल्याने जवळपास दीड हजार प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, तर काही ठिकाणी ऐन वेळी उमेदवाराने अर्ज कायम ठेवल्याने दोन ते चार जागांसाठीच मतदान होत आहे. त्यामुळे या जागांमधील चुरशीची लढत महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकांमध्ये आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे आमदारांनीही लक्ष घातल्याने आगामी दिवसात निवडणुकीतील चुरस अधिक बघायला मिळू शकते. येत्या १३ सारखेला सायंकाळी प्रचाराची अधिकृत सांगता होणार असून, त्यानंतर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख केली जाणार आहे. मतदानाच्या पूर्वीच्या दोन दिवसांतील घडोमोडीवर लक्ष केंद्रित करण्यासाठीचा कार्यक्रमही आखण्यात आला आहे.
प्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. १५ तारखेला प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे.
प्रशासकीय तयारी पूर्णत्वाकडे
प्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहे. जिल्ह्यातील एकूण १,९३३ मतदान केंद्रांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी अंदाजे १० हजार इतके कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील २,१३२ प्रभागामंध्ये ५,८९५ जागांसाठी निवडणुकीतील चुरस वाढली आहे. यापैकी १,६२७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.