अवकाळी पावसाचा वीट उत्पादकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:25+5:302021-06-02T04:13:25+5:30
: ओल्या विटांचे नुकसान, रॉयल्टीमध्ये सवलत देण्याची मागणी पाटोदा : परिसरात गेल्या चार- पाच दिवसांपासून मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पाऊस ...
:
ओल्या विटांचे नुकसान, रॉयल्टीमध्ये सवलत देण्याची मागणी
पाटोदा : परिसरात गेल्या चार- पाच दिवसांपासून मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. या पावसामुळे परिसरातील वीट उत्पादक संकटात सापडले आहेत. ओल्या वीटा भिजत असून कच्या विटा वाचविण्याकरिता तारांबळ उडत आहे. विटांचे मोठे नुकसान होत असल्याने वीट उत्पादकांना रॉयल्टीमध्ये सवलत द्यावी, आशी मागणी उत्पादकांनी केली आहे.
यावर्षी वर्षभर दर महिन्याला दोन- तीन वेळेस अवकाळी पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली असून त्यामुळे तयार कच्च्या विटांचे नुकसान झाले आहे. खराब झालेल्या विटा मजुरांकडून पुन्हा मजुरी देऊन बनवून घ्याव्या लागल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली. कच्च्या विटा बनवून त्या वळण्यासाठी एक सरळ रेषेत एकावर एक रचून ठेवल्या जातात. वीटा या कमीत कमी तीन ते चार दिवस चांगल्या वाळवल्याशिवाय भट्टीला रचता येत नाहीत. मात्र, मागील पंधरवड्यात व आता चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विटा भिजून नुकसान होत आहे. पाऊस व वारा कधीही येत असल्याने अनेक वीट उत्पादकांनी बनविलेल्या कच्च्या विटा ताडपत्रीने झाकून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. सध्या वीट भट्टी हंगामाचा शेवट सुरू आहे. शेवटचा माल हा भट्टी मालकांचा नफा असतो. मात्र, हा मालच भिजून चालल्याने तोटा सहन करावा लागणार आहे. आधीच कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून मालाला उठाव नाही. त्यातच आता अवकाळीचा फटका बसला आहे.
----------------------------
अवकाळी पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी रायल्टीमध्ये सवलत द्यावी.
-सुभाष जोंधळे, वीट उत्पादक, पाटोदा
----------------
बनविलेली कच्ची वीट वाचविण्यासाठी भट्टीमालकांना ताडपत्रीने विटा झाकण्यासाठी अशी कसरत करावी लागत आहे. (०१ पाटोदा १)
===Photopath===
010621\01nsk_5_01062021_13.jpg
===Caption===
०१पाटोदा १