दापूर परिसरात अवकाळी पावसाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 07:23 PM2021-03-21T19:23:46+5:302021-03-21T19:26:30+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात रविवारी (दि.२१) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने पिकांचे ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात रविवारी (दि.२१) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. सुमारे दीड तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. तसेच पहाटेच्या वेळी गारठा असल्याने समिश्र वातावरणाचा अनुभव परिसरात येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके काढणीसाठी लगबग सुरु केली होती. दापूर परिसरात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेघ गर्जना व विजांचा कडकडाटांसह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. सुमारे दीड तास सुरू असलेल्या पावसात गारपिटीने हजेरी लावली. अनेक भागांत शेतातील पिकांमध्ये पाणी साचले होते. रब्बी हंगामातील काढणीस आलेले गहू, हरबरा, ज्वारी, बाजरी, भेंडी, टमाटा, मिरची तसेच कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दापूर भागात वारा व पावसाने गहू व बाजरीचे पिके भुईसपाट झाले आहे.
दोडी, दापूर, गोंदे, चापडगाव, शिवाजीनगर, दत्तनगर, खंबाळे आदी भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दापूर येथील दत्तू आव्हाड, भाऊसाहेब साबळे, बंडू पालवे, दत्तू आव्हाड, संदीप आव्हाड, संपत काटुळे, दत्ता सोनवणे आदींसह अन्य शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
वीज पडून गाय ठार
तालुक्यातील गोंदे शिवारात विजांच्या कडकडाट व पावसाने हजेरी लावली. या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. मनेगाव रस्त्यालगत बिरोबा वस्तीकडे राहणारे शेतकरी शंकर कारभारी शिंदे यांनी गोठ्यात बांधलेल्या गायीवर वीज पडल्याने जागेवर तिचा मृत्यू झाला.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दापूर व गोंदे परिसरात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप व रब्बी हंगामातील दोन्ही पिके वाया गेल्याने बळीराजाच्या पदरी पुन्हा निराशाच पडत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांशी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरपाई देण्यात यावी.
- दत्तात्रय सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, गोंदे.
(२१ दापूर, १, २)