जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 11:12 PM2021-05-06T23:12:39+5:302021-05-07T01:00:11+5:30
नाशिक : शहर व जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी बेमोसमी पावसाचा तडाखा सुरूच असून गुरुवारी (दि.६) सायंकाळी पुन्हा पावसाने गारपिटीसह हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेला कांदा भिजण्याबरोबरच शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता.

गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. गुरुवारी जिल्ह्यातील बागलाण, निफाड, इगतपुरी तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. अभोणा येथील पश्चिम आदिवासी पट्ट्यात सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊण तास जोरदार पाऊस झाला. सध्या परिसरात उन्हाळ कांदा काढणीचे काम सुरू आहे. या पावसामुळे शेतात उघड्यावर काढून
ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने अडचणीत आणखीणच भर पडली. भगूर शहर व परिसरातही मुसळधार पाऊस झाला. काही घरांच्या भिंती कोसळल्या तर काही घरांचे सिमेंटचे पत्रे उडाले. वीजपुरवठा खंडित होऊन गाव अंधारात बुडाले. नाशिक शहराच्या काही भागांत गारांचा पाऊस झाला. त्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. निफाड तालुक्यातील लासलगावसह गोदाकाठ परिसरात तसेच लोहोणेर परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.