वाणी समाजाच्या महाधिवेशनासाठी नाशिकमध्ये बोधचिन्हाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:23 PM2018-09-09T16:23:01+5:302018-09-09T16:25:26+5:30
अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुण्यात होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समाजाचा सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचे दर्शन घडविणार्या बोधचिन्हाचे अनावरण नाशिकमध्ये कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले.
नाशिक : अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुण्यात होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समाजाचा सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचे दर्शन घडविणार्या बोधचिन्हाचे अनावरण नाशिकमध्ये कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले. यावेळी महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष राजेंद्र वाणी, सचिव राजेश कोठावदे, खजिनदार श्यामकांत शेंडे, जिल्हा समन्वयक सचिन बागड, सहसचिव शशिकांत येवले, सहखजिनदार अजय मालपुरे, अॅड. अशोक खुटाडे, शोभा कोतकर, शिरीष नेरकर, अशोक सोनजे व्यासपीठावर उपस्थित होते. पुणे येथील श्यामकांत कोतकर यांनी यावेळी बोधचिन्हाविषयी माहिती दिली. लाडशाखीय वाणी समाजाच्या बोधचिन्ह मानवी शरीरात असलेल्या सात कुंडलिनी चक्रापैकी एक असलेल्या हृदयचक्र ाच्या अकाराचे असून, यातून प्रेम, विश्वास उदारता, भावनिकतेचे दर्शन घडते, तर चक्राभोवती असलेल्या १६ पाकळ्यांतून समाजाच्या १६ कुलस्वामिनी असलेले समाजबांधव एकत्र आणण्याचा प्रयत्न यातून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्याचे श्यामकांत शेंडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बोधचिन्हातील हिरवा रंग प्रगती पैसा समृद्धीशी संबंधित असून, चिन्हातील चांदणी उन्नती, प्रगती, यशाचे प्रतीक आहे. त्याभोवतालचे सहा त्रिकोण हे एकत्र कुटुंबाची शक्ती दर्शवित असून, मध्यभागी असलेले चक्र उद्योग व्यवसायाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाधिवेशनाची माहिती सविस्तररीत्या समाजात तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी वाणीवार्ता या प्रसिद्धी पत्राचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक राजेश कोठावदे यांनी केले व आभार अजय मालपुरे यांनी मानले. सुत्रसंचालन पुणे येथील रत्ना दहिवेलकर यांनी केले.
महाधिवेशनात उद्योग मार्गदर्शन
अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी विविध क्षेत्रांतील उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थित राहणार असून, उद्योजक व्यावसायिकांसाठी व्यावसायिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात येणार आहे. महाधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथम सत्रात बाबा कल्याणी, संजय बजाज व हनुमंत गायकवाड यांची समाजातील व्यावसायिक उद्योजकांना मार्गदर्शन करणार असून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे आध्यात्मिक प्रवचनही होणार असल्याचेही श्यामकांत शेंडे यांनी सांगितले.