उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:40 AM2019-05-23T00:40:38+5:302019-05-23T00:41:04+5:30
महानुभाव पंथातील आधारवड व उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे नाशिक येथे बुधवारी (दि़ २२) पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले़ ते ८० वर्षांचे होते़
नाशिक : महानुभाव पंथातील आधारवड व उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे नाशिक येथे बुधवारी (दि़ २२) पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले़ ते ८० वर्षांचे होते़ उपाध्य कुलाचार्य गुरुवर्य आचार्य बीडकर शास्त्री महंत यांचे ते ज्येष्ठ बंधू होत़
काही काळ अमरावती जिल्ह्यात ऋद्धपूर येथे वास्तव्य केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नजीक रणाईचे येथील प्रणवाश्रम उभारणीनंतर अनेक वर्षांपासून त्यांचे वास्तव्य येथेच होते़ परंतु महानुभाव पंथातील अखिल भारतीय पातळीवरील अनेक धर्मसभा, धर्मपरिषदा आणि जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांचा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कायम संचार असे़ नाशिक, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, पुणे, नगर यांसह अनेक जिल्ह्यांत त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे़
संपूर्ण महानुभव पंथातील मार्ग व्यवस्थेच्या बाबतीत त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे महानुभव पंथातील अनेक कार्यक्रम यशस्वी होत असत़ ब्रह्मविद्या महोत्सव, खिसपुरी महोत्सव, तसेच राज्यभरातील विविध ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर, श्रीदत्त मंदिर आणि श्री चक्रधरस्वामी मंदिरांच्या उभारणीत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होत असे़ त्यांच्या निधनाचे
वृत्त कळताच नाशिक शहरासह जिल्ह्यात संत-महंत आणि भाविकांनी मोरवाडी येथील दत्तमंदिराच्या परिसरात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले़ त्यांच्यावर गुरुवारी (दि़२३) सकाळी १० वाजता रणाईचे (ता़ अमळनेर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़