आगळी गानपर्वणी नाशिककरांना लाभली
By admin | Published: February 17, 2015 01:24 AM2015-02-17T01:24:12+5:302015-02-17T01:25:34+5:30
आगळी गानपर्वणी नाशिककरांना लाभली
नाशिक : बालगंधर्वांपासून ते नूतन गंधर्वांपर्यंतच्या गायनशैलीची उलगडून दाखवलेली वैशिष्ट्ये, त्यांच्या जीवनपटावर टाकलेला प्रकाश...खुद्द सवाई गंधर्वांचा सभागृहात घुमलेला स्वर अन् त्यानंतर कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाचे त्यांच्याच शैलीतले गायन... अशी आगळी गानपर्वणी नाशिककरांना लाभली. निमित्त होते ‘संस्कृती वैभव’ गंधर्व महोत्सवाचे...
‘संस्कृती वैभव’च्या वतीने आयोजित व मैत्रेय प्रस्तुत गंधर्व महोत्सवाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आज उत्साहात प्रारंभ झाला. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे, ‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे, संतूरवादक पं. उल्हास बापट, आमदार सीमा हिरे, ‘मैत्रेय’च्या संपादक जयश्री देसाई, ‘संस्कृती वैभव’चे अध्यक्ष नंदन दीक्षित, राधाकिसन चांडक, पी. एस. कुलकर्णी, डॉ. सुभाष पवार, रवींद्र देवधर, अरविंद पाठक, सुधीर कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गंधर्व महोत्सवाची स्मरणिका व पं. बापट लिखित ‘सहज स्वरांतून मनातलं’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘स्वरांतून मनातलं’ ही अवस्था कठीण असते. राग व अन्य नियमांच्या कडेकोट खंदकात विद्यार्थी गायन शिकतात. पुढे लिहिणारे व गाणारे वेगळे अशी तटबंदी निर्माण होते; मात्र गायक जेव्हा लिहितो, तेव्हा त्याचे सर्व भावजीवन त्यातून कळते, असे उद्गार यावेळी पं. देशपांडे यांनी पं. बापट यांच्या पुस्तकाविषयी काढले. पं. उल्हास बापट म्हणाले, वाचनाची आवड लागण्याच्या वयात वाद्यसंगीतात रमलो. पुढे माणसे वाचण्याची आवड लागली. स्मरणशक्तीतून व्यक्तिचित्रे, वृत्तीचित्रे, गुरुजनांचे अनुभव लिहून ते पुस्तकबद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार हिरे व जयश्री देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदन दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. उत्तरा मोने यांनी निवेदन केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात रसिकांना गंधर्वांच्या गायकीची झलक अनुभवायला मिळाली. बालगंधर्वांच्या आवाजातील ‘मम आत्मा गमला’ हे पद, तर सवाई गंधर्व यांचा राग शंकरा ऐकून रसिकांचे कान तृप्त झाले. देवगंधर्व, भूगंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, प्रौढ गंधर्व, गुणी गंधर्व आदिंची छायाचित्रे व माहितीच्या स्लाइड्स यावेळी चैतन्य कुंटे यांनी सादर केल्या. त्यानंतर पं. सत्यशील देशपांडे यांनी कुमार गंधर्वांचे ‘शून्य गढ शहर’ हे निर्गुणी भजन सादर केले. ‘गुरुजी मैं तो एक निरंजन’ हे पद व त्यानंतर गौरी रागातील ‘घुंघट ना खोलो जी’ ही बंदिश त्यांनी गायली. त्यांना भरत कामत (तबला) यांनी साथसंगत केली. आनंद भाटे यांनी बालगंधर्व, छोटा गंधर्व, सवाई गंधर्व व कुमार गंधर्वाच्या गायकीची वैशिष्ट्ये अप्रतिमरीत्या उलगडून दाखवली. त्यांना राजीव परांजपे (आॅर्गन), चैतन्य कुंटे (संवादिनी) व भरत कामत (तबला) यांनी साथसंगत केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)