स्वखर्चातून मुलींसाठी उभारली अद्ययावत स्वतंत्र अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:12+5:302021-07-31T04:15:12+5:30
शैलेश कर्पे, सिन्नर : ग्रामीण भागात मुलींना अभ्यासासाठी बाहेर अभ्यासिकेत पाठविण्यास अजूनही काही पालक धजावत नाहीत. त्यामुळे क्षमता ...
शैलेश कर्पे, सिन्नर : ग्रामीण भागात मुलींना अभ्यासासाठी बाहेर अभ्यासिकेत पाठविण्यास अजूनही काही पालक धजावत नाहीत. त्यामुळे क्षमता असूनही ग्रामीण भागातील मुली स्पर्धा परीक्षेपासून दूर राहतात. पालकांनी मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासिकेत पाठवावे यासाठी सिन्नरचे नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्षात तो अंमलातदेखील आणला आहे.
प्रभाग ११ चे नगरसेवक सोमनाथ पावसे स्वत: ग्रामीण भागातील गरिबीतून आलेले आहे. बांधकाम व्यवसायात स्थिर झाल्यानंतर त्यांनी समाजकार्याचा वसा घेतला. त्यातून पावसे यांनी अनेक उपक्रम राबविले. तथापि, ग्रामीण भागातील पालक मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अजूनही बाहेर अभ्यासिकेत पाठवत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे पावसे यांनी स्वखर्चातून मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. शहरातील संजीवनीनगर भागात नगरसेवक पावसे यांच्या पुढाकाराने मुलींसाठी अद्ययावत अभ्यासिका उभारण्यात आली आहे. मुलींसाठीची ही जिल्ह्यातील बहुधा पहिलीच आगळीवेगळी अभ्यासिका असावी.
नगरसेवक पावसे यांनी यांनी होतकरू मुलींसाठी सर्व सुविधांयुक्त मोफत अभ्यासिकेची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवली.
संजीवनीनगर भागात पावसे संकुलसमोर नगर परिषदेची इमारत असून, या ठिकाणी महिलांसाठी उपक्रम राबविण्याची परवानगी पावसे यांनी मिळविली होती. तसा ठराव नगर परिषदेच्या सभेत करण्यात आला. त्यानुसार इमारतीची डागडुजी, रंगरंगोटी करण्यात आली. तसेच पावसे यांनी स्वखर्चातून एकावेळी २४ मुलींना अभ्यास करता येईल, अशा पद्धतीने बाके तयारी केली. ही अभ्यासिका सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार असून, सहा-सहा तासांच्या दोन बॅचेसमध्ये दिवसभरात ४८ मुलींना मोफत अभ्यास करता येणार आहे.
अभ्यासिकेत मुलींना अंगणवाडी सेविका ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांपर्यंतची पुस्तके, स्वच्छतागृह, वायफाय इंटरनेट सुविधा, सुटसुटीत आसनव्यवस्था, वाचनासाठी विविध वृत्तपत्रे आदी सुविधा उपलब्ध असतील. अभ्यासिकेत व परिसरावर सीसीटीव्हीची नजर राहणार असून, व्याख्यानमाला आयोजित करणार आहेत.
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर शहरात सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली. त्यांची प्रेरणा घेऊन ही अभ्यासिका सुरू करण्यात आल्याचे नगरसेवक पावसे यांनी सांगितले. येथे स्पर्धा परीक्षांची विविध ९० पुस्तके उपलब्ध करण्यात आलेली आहेत. आणखी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभ्यासिका परिसरात उभारण्यात आलेल्या बागेमुळे शांत व प्रसन्न वातावरणात मुलींना अभ्यास करता येणार आहे.
फोटो - ३० सिन्नर पावसे१/२
सिन्नर येथे नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी स्वखर्चातून मुलींसाठी उभारलेली स्वतंत्र अभ्यासिका.
300721\30nsk_19_30072021_13.jpg~300721\30nsk_21_30072021_13.jpg
फोटो - ३० सिन्नर पावसे/१सिन्नर येथे नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी स्वखर्चातून मुलींसाठी उभारलेली स्वतंत्र अभ्यासिका.~फोटो - ३० सिन्नर पावसे१/२