मालेगावात साकारतेय अद्ययावत प्रशिक्षण केंद्र
By admin | Published: June 17, 2014 12:06 AM2014-06-17T00:06:15+5:302014-06-17T00:16:51+5:30
मालेगावात साकारतेय अद्ययावत प्रशिक्षण केंद्र
शफीक शेख
मालेगाव
येथील सामान्य रुग्णालयात
शासनाने मंजूर केलेल्या परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाचे बांधकाम वेगात सुरू असून, कसमादे परिसरातील परिचारिका होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींची मोठी सोय होणार आहे.
मालेगावी राज्य शासनाने गेल्यावर्षी १५ मार्च २०१३ रोजी परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह इमारतीच्या बांधकामास परवानगी दिली. एकूण दोन हजार २४०.२८ चौ. मी. क्षेत्रफळावर इमारत बांधकाम सुरू असून, तळ मजल्यावर चार वर्गखोल्या, वाचनालय, प्राचार्य कक्ष आणि मीटर रूम याची व्यवस्था राहील.
पहिल्या मजल्यावर तीन परिचर्या प्रयोगशाळा, शिक्षकांसाठी दोन खोल्या, प्रशासकीय कक्ष, उपप्राचार्य कक्ष, संगणक कक्ष व प्रतीक्षा रूम यांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर सेमिनार हॉल, सभागृह, मिटिंग हॉल, प्रतीक्षा रूम, शिक्षकांचा कक्ष व प्रयोगशाळा यांचा समावेश आहे.
मुलींसाठी वसतिगृह
प्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या निवासासाठी बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाची इमारत तीन हजार १२४.६४ चौ.मी. क्षेत्रात तयार होत आहे.
सदर वसतिगृहात ११२ विद्यार्थिनी आणि आठ मुलांच्या निवासाची
व्यवस्था होणार आहे. त्यात तळ मजल्यावर प्रत्येकी एका रूममध्ये दोन मुली असे १६ कक्ष व प्रत्येकी आठ मुलांसाठी चार कक्ष असतील.
त्यात जिम्नॅशियम रूम, सिक रूम, स्टोअर रूम, रेक्टर रूम, स्वयंपाकगृह व भोजन कक्षाचा समावेश आहे. पहिल्या मजल्यावर असा प्रत्येक कक्षात दोन मुलींची व्यवस्था राहणार असून, एकूण २० कक्ष व हॉल असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी दोन मुलींसाठी २० कक्ष असणार आहेत. आमदार दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमाकांत जाधव, डॉ. डांगे यांची बैठक घेण्यात आली. त्यात संबंधिताना सूचना देण्यात आल्या. कार्यकारी अभियंता मराठेदेखील यावेळी उपस्थित होते.
खासगी जागेत वर्ग
शासनाने या वर्षापासून परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे वर्ग सुरू केल्यास भाड्याच्या इमारतीत हे वर्ग भरविण्यात येणार आहेत. त्यासाठी मनमा चौफुलीवरील जीवन हॉस्पिटलच्या इमारतीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते.
एएनएम/जीएनएमची व्यवस्था
मालेगावच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रात एएनएम आणि जीएनएम अशा दोन्ही कोर्सेसच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण मिळणार असून, त्यांच्या निवासाचीही सोय होणार आहे.