उलथापालथ : कॉँग्रेस - महाज युती संपुष्टात; कॉँग्रेस विरोधात सर्व एकत्र?
By admin | Published: July 22, 2014 10:37 PM2014-07-22T22:37:16+5:302014-07-23T00:27:01+5:30
मालेगावी नवीन राजकीय समीकरणांना वेग
मालेगाव ल्ल
येथील महानगरपालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व तिसरा महाज यांच्यातील युती संपुष्टात आल्याचे तिसरा महाजचे संस्थापक आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी एकतर्फी घोषित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुका पाहता तसे होणे अपेक्षितच होते. मात्र त्यामागे केवळ विधानसभा निवडणुकीचे गणित नसून त्याचा परिणाम मनपातील सत्तांतरणावरदेखील होऊ शकतो.
शहरातील दखनी-मोमीन वाद पाहता विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याच्या बोलीवर केवळ चार नगरसेवक असूनही ज्येष्ठ जनता दल नेते निहाल अहमद यांचे पुत्र मनपातील जनता दल गटनेते बुलंद एक्बाल यांच्या गळ्यात अनपेक्षितरीत्या महापौरपदाची माळ पडू शकते. अर्थात स्थायी समिती सभापतिपद व उपमहापौरपद यावरही तिसरा महाजचाच दावा राहणार आहे. मात्र यासाठी आवश्यक मनपातील बहुमताचा आकडा पार करण्यासाठी संभाव्य तिसरा महाजला जदच्या आघाडीला कुणाची व कशी आणि कोणत्या अटी-शर्तींवर मदत लाभते याकडे आता राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.
दोन वर्षांपूर्वी ८० सदस्य असलेल्या मनपा सभागृहात कॉँग्रेस (२४) व तिसरा महाज (२०) यांच्या आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्यात महापौरपद व स्थायी समिती सभापतिपद कॉँग्रेसने आपल्याकडे राखले. उपमहापौरपद तेवढे महाजकडे होते. मनपाच्या कारभारात आणि शहरातील तथाकथित विकासकामात महाजच्या नगरसेवकांना सतत डावलण्यात आल्याचा आरोप कायम होत राहिला.
तसेच शहराच्या राजकारणात दखनी-मोेमीन वाद पूर्वापार आहे. त्यामुळे दखनी असलेल्या माजी आमदार रशीद शेख व पुत्र आसिफ शेख यांना शह देण्यासाठी अन्सारी-मोमीन गटाचे प्रतिनिधी असलेले ज्येष्ठ जनता दल नेते निहाल अहमद व आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची पडद्यामागे युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वयोमान व आजारपणामुळे निहाल अहमद यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. जनता दलाकडून विधानसभेसाठी कोणी उमेदवारी करणे व त्यास जनसमर्थन लाभणे तसे अवघड आहे. त्यामुळे आपला मुलगा तथा मनपातील जदचे गटनेते बुलंद एक्बाल यांना शहराच्या राजकारणात ‘सेट’ करण्याचा निहाल अहमद यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने मनपाचे महापौरपद मुलगा बुलंद एक्बाल यास दिले, तर आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना जनता दलाकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो. शेख पिता पुत्रांचा मुकाबला करण्यासाठी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हा पर्याय स्वीकारतील शिवाय मनपातील उपमहापौरपद व स्थायी समिती सभापतिपद पदरात पाडून घेतील, असा अंदाज आहे.
८० सदस्यांच्या सभागृहात कॉँग्रेसचा (२४ सदस्य) मुकाबला करण्यासाठी महाज व जनता दल (२०+४=२४) संख्याबळ पुरेसे नाही. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असा ४१चा आकडा पार करण्यासाठी शिवसेना आघाडी (११) व राष्ट्रवादी (८) तसेच अपक्ष (५) व मनसे (२) व इतर पक्षीय नगरसेवकांची मदत घेतली जाऊ शकते. आमदार भुसे व आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यातील सख्य पाहता सेना महाज व जदला मदत करू शकते.
तसेच शेख पिता-पुत्रास विरोध म्हणून युनूस ईसा हे राष्ट्रवादी (८) व इतर मित्रपक्ष यांची रसद महाज -
जद आघाडीस पुरवू शकतात.
त्यासाठी पडद्यामागे काय हालचाली
व तडजोडी होतात यावर बऱ्याच राजकीय घडामोडी अवलंबून
आहेत. (प्रतिनिधी)