किल्ले संवर्धनासाठी धरणे
By admin | Published: December 16, 2015 12:14 AM2015-12-16T00:14:33+5:302015-12-16T00:19:09+5:30
आंदोलन : सह्याद्री प्रतिष्ठान-शिवकार्य गडकोट मोहीम
नाशिक : जिल्ह्यासह राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार मागणी करूनदेखील किल्ले वाचविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ऐतिहासिक पाऊलखुणा पुसण्याच्या मार्गावर असून, महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे किल्ले व गड नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ले संवर्धनासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न करण्याच्या मागणीसाठी शिवकार्य गडकोट मोहीम व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील भुईकोट, समुद्री आणि डोंगरी गडकिल्ल्यांचे सर्वेक्षण करून सर्वच गडकोट संवर्धन कार्यासाठी तातडीने पूरेपूर निधी मंजूर करून किल्ले संवर्धनाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तंबू उभारून त्यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील विविध गड-किल्ल्यांची दुरवस्था दर्शविणारी छायाचित्रे लावून शासनाच्या उदासीनतेचा निषेध करत तीव्र घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमधील किल्ल्यांवर करण्यात आलेल्या विकासकामांची वास्तव चौकशी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
तीर्थक्षेत्र विकास निधी, पर्यटन निधी, वनविभागाचा निधी, खासदार-आमदार निधीमधून करण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अजिंक्य महाले, योगेश कापसे, कृष्णा भोर, विनायक येवले, पवन माळवे, अभिजित गोस्वामी, राम खुर्दळ आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)