कातकरी समाजासाठी उत्थान योजना तत्काळ सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 09:38 PM2020-10-23T21:38:15+5:302020-10-24T02:53:51+5:30
ग्रामीण अतिदुर्गम भागातील विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी जमातीतील कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्थान योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पेठ : ग्रामीण अतिदुर्गम भागातील विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी जमातीतील कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्थान योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पेठ-सुरगाणा जनसेवा मंडळ व जनजाती कल्याण आश्रमामार्फत उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले
आहे की, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यातील कातकरी घटकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवल्या. तरीदेखील सर्वच योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यास अनेक अडचणी निर्माण होतात.
त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एकून सहा विभागांपैकी कोकण, पुणे, नाशिक या तीन विभागांमध्ये कातकरी जमाती असून, शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. त्यातील सहा विभागापैकी कोकण विभागामध्ये कातकरी बांधवांच्या विकासासाठी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी अनुलोम या सामाजिक संस्थेच्या मदतीने उत्थान योजनेला शुभारंभ करून विविध उपयोजना कार्यक्रम चालू आहेत. त्याअनुषंगाने जनजाती कल्याण आश्रम व जनसेवा मंडळ यांच्यामार्फत कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘उत्थान’ योजनेअंतर्गत तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषी विभागातील कर्मचारी यांची समिती स्थापन करून कातकरी समाजाचा विकास करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी जनजाती कल्याण आश्रमाचे स्वप्निल वाघमारे, सागर चव्हाण, जनसेवा मंडळाचे जनसेवक कमलेश वाघमारे, दिलीप महाले उपस्थित होते.