थर्टीफर्स्ट साजरा करून घरी परततांना रिक्षा उलटून कारवर आदळल्याने बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 04:57 PM2019-01-01T16:57:50+5:302019-01-01T16:59:56+5:30
नाशिक : सुला विनियार्डमधून थर्टिफर्स्ट साजरा करून रिक्षाने घरी परतत असताना गंगापूर रोडवरील कानेटकर उद्यानाजवळ रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने ती उलटून कारवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात राशी राजेश चौधरी (रा़ श्रमिक नगर, सावतामाळी बसस्टॉप, सातपूर) या सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़३१) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात मयत मुलीची आई, वडील व अडीच वर्षीय लहान भाऊ व रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रमिकनगरमधील रहिवासी राजेश गंगाराम चौधरी(४५) हे पत्नी रिया चौधरी (४२), मुलगी राशी चौधरी (६) व मुलगा ऋतिक चौधरी (अडीच वर्षे) यांना ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गंगापूर गावाकडील सुला विनियार्डमध्ये गेले होते़ त्यांनी प्रवासासाठी रिक्षाचालक विठ्ठल साहेबराव पाटील (रा. रूम नंबर १९८, सद्गुरूनगर नंबर १, दसक, जेलरोड) यांची रिक्षा (एमएच १५, एफयू १६०४) प्रवासासाठी बोलावली होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास राजेश चौधरी हे सुला विनियार्ड येथून रिक्षाने घरी परतत होते़ यावेळी कानेटकर उद्यानाजवळ (वीटभट्टीसमोरून) येत असताना रिक्षाचालक विठ्ठल पाटील याचे भरधाव रिक्षावरील नियंत्रण सुटले व रिक्षा उलटून समोरून येणाऱ्या कारवर (एच्मएच ०२, बीडी ५६९४) जाऊन आदळली़
या अपघातात रिक्षाचालक पाटील तसेच पाठिमागे बसलेले राजेश चौधरी व त्यांचे कुटुंबिय अक्षरश: फरफटत जाऊन गंभीर जखमी झाले़ तर सहा वर्षीय राशी चौधरी हिच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला़ यातील गंभीर जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या अपघातातील जखमी रिक्षाचालक विठ्ठल पाटील हा मद्यसेवन करून रिक्षा चालवित असल्याचे पोलीस तपसात समोर आले आहे़
या प्रकरणी कारमधील सारिका भूषण आहेर (३६, रा. जलसंपदा, जाधव फार्म, टाकळी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे़