शेती, आर्थिक मंदी विषय अस्पर्शी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 02:06 AM2019-09-20T02:06:40+5:302019-09-20T02:07:36+5:30
कांद्याच्या भावातील चढ-उतार त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे उद्योग क्षेत्रावर आलेले संकट या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही विषय अस्पर्शी राहिल्याने संबंधित घटकांची यामुळे निराशा झाली.
नाशिक : कांद्याच्या भावातील चढ-उतार त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे उद्योग क्षेत्रावर आलेले संकट या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही विषय अस्पर्शी राहिल्याने संबंधित घटकांची यामुळे निराशा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.१९) पंचवटीत सभा झाली. त्याकडे अनेक घटकांचे लक्ष लागून होते. मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला. त्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला ड्रायपोर्टचा विषय आवर्जून मांडला. शेतकरी सन्मान योजनेवर मत मांडले, मात्र कांद्याच्या विषयाला मात्र त्यांनी हात घातला नाही.
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात अस्थिरता आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले असले तरी त्या आधी भाव सातत्याने कोसळत होते. कांद्याच्या भावाचा हा नेहमीचा प्रश्न असून, त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारादेखील दिला होता. त्यामुळे मोदी यांच्या सभेत याविषयावर ते बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यावर ते बोलले नाहीत. याशिवाय वाहन उद्योगातील मंदी, बंद पडलेले कारखाने, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयाला हात न घालता त्यांनी विविध योजना मात्र सर्व सामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा केला. एचएएल संदर्भातही त्यांनी व्यक्तव्य केले नाही.