शहरातील कोरोना निर्बंध शिथिल लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण : ग्रामीणमध्ये निर्बंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 12:24 AM2022-03-19T00:24:09+5:302022-03-19T00:24:09+5:30

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लावलेले काहीअंशी निर्बंध उठविण्यासाठी देण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दिष्ट नाशिक महापालिका क्षेत्रात ...

Urban Corona Restrictions Relaxed Vaccination Objectives Achieved: Restrictions in rural areas remain | शहरातील कोरोना निर्बंध शिथिल लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण : ग्रामीणमध्ये निर्बंध कायम

शहरातील कोरोना निर्बंध शिथिल लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण : ग्रामीणमध्ये निर्बंध कायम

Next

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लावलेले काहीअंशी निर्बंध उठविण्यासाठी देण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दिष्ट नाशिक महापालिका क्षेत्रात पूर्ण झाल्यामुळे तसेच घटती रुग्णसंख्या व मृत्यूचे कमी झालेले प्रमाण पाहता नाशिक शहरातील कोरोना निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. या निर्बंध शिथिलतेने चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, स्पा सेंटर, हॉटेल, रेस्टॉरंट आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असून, या शिवाय लग्नसमारंभाच्या उपस्थितीवरील निर्बंध पूर्णत: उठविण्यात येणार असून, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांनाही पूर्णत: सूट देण्यात येणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत लावण्यात आलेली संचारबंदीही मागे घेण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय शुक्रवारी (दि. १८) घेण्यात आला असला तरी, येत्या दोन दिवसात त्यासंदर्भातील आदेश काढण्यात येणार आहेत.

शुक्रवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाचे सद्य:स्थितीत असलेले ररुग्ण व पॉझिटिव्हिटी रेट याचा आढावा घेण्यात आला. १७ मार्च रोजी जिल्ह्यात ७४ रुग्ण असून, पॉझिटिव्हिटी दर ०.५० इतका खाली गेला आहे. शिवाय ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर एकही रुग्ण उपचार घेत नसून, जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा दरही १.८६ टक्क्याने कमी झाला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
शासनाने ९ जानेवारी रोजी काढलेल्या कोरोना निर्बंध आदेशात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांना कोरोना निर्बंध मुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. साधारणत: ९० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालेला, तर ७० टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झालेला असेल तर निर्बंध मुक्त करण्याचे ठरविण्यात आले होते. नाशिक महापालिका क्षेत्रात हे दोन्ही निकष पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील कोरोना नियम शिथिल करण्यात येत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही लसीकरणाचा वेग वाढत नसल्याने पालकमंत्री भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशा सूचनाही भुजबळ यांनी यावेळी केल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
..असे होते निर्बंध
* जानेवारी महिन्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना निर्बंधात चित्रपटगृहे, नाट्यगृहे, अमेजिंग पार्कमध्ये क्षमतेच्या पन्नास टक्केच उपस्थिती अनिवार्य केली होती.
* स्पा सेंटर, जलतरण तलाव, स्विमिंग पूल, वॉटर पार्क येथेही पन्नास टक्के क्षमतेने उघडण्यास अनुमती दिली होती.

* धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांना जागेच्या प्रमाणात अथवा २५ टक्के उपस्थितीला मुभा होती.
* लग्नसमारंभासाठी दोनशे वऱ्हाडींना अथवा जागेच्या क्षमतेवर ५० टक्के उपस्थितीला परवानगी होती.

Web Title: Urban Corona Restrictions Relaxed Vaccination Objectives Achieved: Restrictions in rural areas remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.