अमेरिकेचे वाणिज्यदूत थेट गोदाकाठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:57 AM2020-11-16T00:57:39+5:302020-11-16T00:58:14+5:30
भारतातील अमेरिकेचे वाणिज्यदूत डेविड जे रॅन्झ हे रविवारी (दि.१५) अचानकपणे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरासह गोदाघाट व तपोवन परिसराला भेट दिली. यावेळी प्राचीन गंगा-गाेदावरी मंदिर व कुंभमेळ्याविषयी माहितीही त्यांनी जाणून घेतली.
नाशिक : भारतातील अमेरिकेचे वाणिज्यदूत डेविड जे रॅन्झ हे रविवारी (दि.१५) अचानकपणे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरासह गोदाघाट व तपोवन परिसराला भेट दिली. यावेळी प्राचीन गंगा-गाेदावरी मंदिर व कुंभमेळ्याविषयी माहितीही त्यांनी जाणून घेतली. डेविड यांनी २७ ऑगस्ट २०१९ साली भारताच्या अमेरिकेच्या वाणिज्यदूत पदाचा (कॉन्सल जनरल) पदभार स्वीकारला. त्यांचे मुंबई येथे कार्यालय आहे. रॅन्झ हे त्यांच्या पत्नी परराष्ट्र सेवा अधिकारी टॅली लिंड यांच्यासोबत नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर रविवारी आल्या होत्या. त्यांनी काळाराम मंदिराला भेट दिल्यानंतर रामकुंडावर हजेरी लावली. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल हेदेखील उपस्थित होते. पुरोहित संघ व गंगा-गोदावरी मंदिराच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी सपत्नीक गोदाकाठावर पायी फेरफटका करत गांधी तलाव, देवमामलेदार मंदिर परिसर, निळकंठेश्वर मंदिर, दुतोंड्या मारुतीची भव्य मूर्ती न्याहाळत येथील आकर्षक कलाकुसर असलेल्या पुरातन मंदिरांसमोर आपली छबीदेखील मोबाइलने टिपली. यावेळी त्यांनी येथील काही दुकानांनाही भेट दिली. तसेच रामकुंडात श्रीफळ वाहिले. येथील गोमुखातून पडणाऱ्या पाण्याचेही त्यांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यातून छायाचित्र क्लिक केले.
दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी यावेळी परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त पुरविला होता. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सुरक्षारक्षकदेखील होते.