अमेरिकेतील युवतीची पर्स मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:18 AM2019-03-10T00:18:13+5:302019-03-10T00:18:53+5:30
अमेरिकेत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणारी युवती सुट्टीनिमित्त नाशिकला आली असता प्रवासादरम्यान महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स हरविल्यानंतर रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ती पर्स सदर युवतीला पुन्हा मिळाली.
नाशिकरोड : अमेरिकेत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणारी युवती सुट्टीनिमित्त नाशिकला आली असता प्रवासादरम्यान महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स हरविल्यानंतर रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ती पर्स सदर युवतीला पुन्हा मिळाली.
नाशिकला इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर कनन तेजनानी या सध्या अमेरिकेत आयटी इंजिनिअरिंगची नोकरी करत आहेत. सुट्टीनिमित्त त्या टाकळीरोड येथील ड्रीमसिटीमध्ये आपल्या घरी आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी तेजनानी या मैत्रिणीसह दुचाकीवरून नाशिकरोडच्या दिशेने येत असताना आंबेडकरनगरजवळ त्यांची पर्स रस्त्यात खाली पडली. यावेळी पाठीमागून येणारे रिक्षाचालक कुमार प्रभाकर जाधव यांना रस्त्यात पडलेली सदर पर्स सापडली. रिक्षाचालक जाधव यांनी सापडलेली पर्स नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणून दिली. मात्र सदर बाब उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने जाधव यांना उपनगर पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली.
सदर बाब पोलीस नियंत्रण कक्षास कळविण्यात आली. त्यानंतर रिक्षाचालक जाधव यांनी वास्को चौकातील पान दुकानदार मित्रास पर्स सापडल्याची माहिती दिली.
यावेळी तेथून जाणारे नाशिकरोडचे बिट मार्शल पोलीस गणेश गोसावी, विकास ढेरिंगे यांना रिक्षाचालक जाधव व टपरीचालक मित्रांनी पर्स सापडल्याची माहिती दिली. गोसावी व ढेरिंगे यांनी उपनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पर्समधील कागदपत्रांच्या आधारे कनन तेजनानी यांचा मोबाइल नंबर शोधून त्यांना हरवलेली पर्स सापडली असल्याची माहिती दिली.
महत्त्वाची कागदपत्रे दिली परत
कनन तेजनानी यांनी आपली पर्स व त्यामधील डॉलर, व्हिसा, पासपोर्ट, ड्रायिव्हंग लायसन्स आदी महत्त्वाच्या कागदपत्रांची ओळख दिल्यानंतर सदर पर्स पोलिसांनी त्यांच्या हवाली केली. वरिष्ठ निरीक्षक एन. एस. माईनकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर जाऊन रिक्षाचालक कुमार जाधव याचा सत्कार केला. तर तेजनानी यांनीदेखील रोख बक्षीस दिले. यावेळी गणेश गोसावी, विकास ढेरिंगे, जनार्दन गायकवाड, प्रकाश आरोटे आदी उपस्थित होते.