नाशिक महापालिकेतील दलित वस्ती निधीचा वापर अन्य प्रभागांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 06:56 PM2017-12-22T18:56:43+5:302017-12-22T18:57:51+5:30
शिवसेनेचा आरोप : भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात खैरात
नाशिक - महापालिकेने मागासवर्गियांसाठी राखीव ठेवलेल्या ५ टक्के निधीचा वापर दलित वस्ती सुधारणेवर करण्याऐवजी ज्याठिकाणी मागासवर्गिय वसाहती नाहीत, अशा प्रभागांवर केला असून त्यात बव्हंशी भाजपा नगरसेवकांच्या प्रभागत निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दलित वस्ती सुधारणा निधीच्या खर्चाबाबतचे आॅडिट करण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.
विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दलित वस्तीवर महापालिकेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या खर्चाचा तपशिलच पुराव्यानिशी सादर केला. यावेळी प्रशांत दिवे यांनी सांगितले, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता दलित वस्ती सुधारणा निधी म्हणून १३ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली तर आतापर्यंत २४ कोटी २ लाख रुपयांची प्राकलने वेगवेगळ्या स्तरावर कार्यवाहीत आहेत. १४ कोटी ९६ लाखांच्या शिल्लक निविदा असून या वर्षात आतापर्यंत ८७ लाख ६३ हजार रुपयांची देयके अदा होऊ शकली आहेत. दलित वस्ती सुधारणेवर अंदाजपत्रकापेक्षा २६ कोटी ६१ लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत या निधीअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांचा तपशिल पाहता, मागासवर्गिय वसाहती या निधीपासून वंचित ठेवण्यात आल्या आहेत तर ज्याठिकाणी मागासवर्गिय वसाहती अथवा लोकसंख्या नाही तेथे कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. प्रभाग १७ हा मागासवर्गियांची लोकसंख्या असलेला सर्वात मोठा प्रभाग आहे. परंतु, याठिकाणी एकही काम प्रस्तावित नाही याऊलट या निधीतून पेठरोड ते पेठनाका कॅनालपावेतो ३ कोटी १५ लाख रुपये खर्चाचा डांबरी रस्ता प्रस्तावित केलेला आहे. प्रभाग ४ मधील तारवालानगर, सहकार नगर याठिकाणी पथदीप तर श्रीरामनगर येथील उद्यानात समाजमंदिर प्रस्तावित केलेले आहे. लामखेडेमळा येथील मोकळ्या भूखंडावर अभ्यासिका, लोकसहकारनगरमध्ये ६० लाखांचे काम तर प्रभाग २ मधील मराठानगर मध्ये २४ लाखांचे मलवाहिका टाकण्याचे प्रस्तावित केलेले आहे. महापौरांच्या प्रभाग १ मधील केतकी सोसायटी परिसरातही ७७ लाख रुपये खर्चाची अभ्यासिका प्रस्तावित आहे. कामांच्या यादीचे अवलोकन केले असता भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांवर दलित वस्तीच्या निधीची खैरात करण्यात आलेली आहे. दलित वस्ती सुधारणा निधी अन्य प्रभागांसाठी वापरण्यात येत असून या सा-या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही प्रशांत दिवे यांनी केली आहे. सदर प्रकरण आपण धसास लावणार असून प्रसंगी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचीही तयारी असल्याचे दिवे यांनी स्पष्ट केले.
महासभेत आवाज उठवणार
मुळात मागासवर्गियांसाठी राखीव ५ टक्के निधीची तरतूदच केली जात नाही. वास्तविक, दलित वस्ती सुधारणा निधी हा वंचित घटकांसाठीच वापरला पाहिजे. तो अन्यत्र वळविता येत नाही. मात्र, याठिकाणी भाजपाच्या विशिष्ट नगरसेवकांच्या प्रभागात हा निधी वळविण्याचा प्रयत्न दिसून येतो आहे. या सा-या प्रकरणाचे आॅडिट होण्याची गरज आहे. येत्या महासभेत शिवसेना या प्रकरणी निश्चितच आवाज उठवणार आहे.
-अजय बोरस्ते, विरोधीपक्षनेता,मनपा