‘ई-पॉस’च्या वापराने वाढणार कोरोनाचा धोका; म्हणून दुकानदारांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:23 AM2021-05-05T04:23:11+5:302021-05-05T04:23:11+5:30
गेल्या वर्षभराच्या काळात कोरोनामुळे राज्यात अनेक रेशनदुकानदारांचा बळी गेला असून, अनेकांना कोरोनावर उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च उचलावा लागला ...
गेल्या वर्षभराच्या काळात कोरोनामुळे राज्यात अनेक रेशनदुकानदारांचा बळी गेला असून, अनेकांना कोरोनावर उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च उचलावा लागला आहे. त्यामुळे कोरोनाचे पूर्णपणे निर्मूलन होईस्तोवर ‘ई-पॉस’ यंत्राचा वापर करू नये, अशी आग्रही मागणी रेशन दुकानदार संघटनेने शासनाकडे केली आहे. ई-पॉस यंत्राचा वापर केल्यास त्यावर प्रत्येकाचे बोटाचे ठसे घेतले जातील व त्यातून कोरोना वाढण्यास मदत होईल, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. आरोग्य खात्याच्या मते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास एकमेकांचा स्पर्शदेखील तितकाच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
------------------
रेशन दुकानांवर सॅनिटायझर कोण पुरविणार?
१) रेशनवर धान्य वाटप करताना वापरण्यात येणाऱ्या ई-पॉस यंत्राचा वापर सरकारने अनिवार्य केल्यामुळे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाच्या वापरानंतर यंत्राची स्वच्छता करणे बंधनकारक आहे.
२) शासनाने आदेश दिले असले, तरी यंत्राची स्वच्छता व रेशन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना शासनाने केलेली नाही.
३) ई-पॉस यंत्राला प्रत्येक वेळी सॅनिटाइझ करण्यासाठी सामग्री कोण पुरविणार, हा कळीचा प्रश्न आहे. रेशन दुकानदार हा खर्च पेलण्यास तयार नाहीत.
--------------
रेशन दुकानदारांच्या अशा आहेत मागण्या
१) शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या रेशन दुकानदारांनाही कोरोना योद्धा म्हणून गणले जावे व त्यांना विम्याचे संरक्षण मिळावे.
२) दुकानदारास कोरोना झाल्यास त्याला शासकीय रुग्णालयातून मोफत औषधोपचार केला जावा.
३) दुकानदाराचा मृत्यू झाल्यास त्याला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी.
-----------
लाभार्थ्यांची गैरसोय कायम
शासनाचे आदेश व रेशन दुकानदारांच्या मागण्यांमुळे संप करण्याचा दिलेला इशारा पाहता, लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळेल काय, हाच प्रश्न समोर उभा राहिला आहे.
-----------------------
एकूण रेशनकार्डधारकांची संख्या- १३, ५७, ३८६
अंत्योदय- १,८१,५९४
केशरी- ४,८३,९३७,
प्राधान्य कुटुंब- ६,९१,८५५
-----------
धान्य वितरण नियमित होईल
जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आवश्यक असलेला धान्याचा साठा उपलब्ध आहे. मे व जून महिन्यात त्याचे वाटप केले जाणार असल्याने मे महिन्यात त्याचे वाटप सुरू होईल.
- कैलास पवार, सहायक पुरवठा अधिकारी